विद्यार्थ्यांच्या लसीकरणप्रश्नी सांगलीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:48+5:302021-09-15T04:30:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी, या मागणीसाठी मंगळवारी सांगलीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ...

विद्यार्थ्यांच्या लसीकरणप्रश्नी सांगलीत निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवावी, या मागणीसाठी मंगळवारी सांगलीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार व सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. शुभम जाधव म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून देशातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे, अशी आमची मागणी आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा.
यावेळी संदीप व्हनमाणे, शुभम ठोंबरे, सचिन चव्हाण, ऋषिकेश कांबळे, अमोल पाटील, व्रजेश पडियार, साद राहिमतपुरे, तुषार सरगर, विशाल लालवानी, ओंकार सुतार, मोहम्मद गोदड, आदर्श कांबळे आदी उपस्थित होते.