उमदी : उमदी (ता. जत) येथे बीज प्रक्रिया, चारा प्रक्रिया व भुईमूगमधील तण नियंत्रण, फळझाडांचे खत व्यवस्थापन, तसेच अत्याधुनिक सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन व त्यांचे भविष्यकाळातील फायदे, मोबाईल ॲप व इंटरनेटचा बाजार व्यवस्थापनासाठी वापर, यासारख्या महत्त्वपूर्ण शेती संबंधित विषयांवर कृषीकन्यांनी शिवारात जाऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
भुईमूग पिकामध्ये घेण्यात आलेल्या ड्रम रोलिंग प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अशा विविध विषयांवर कृषिकन्या स्वप्ना साबणी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर यांच्यावतीने ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत पारंपरिक शेतीसोबत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढीवर कशाप्रकारे भर द्यावा, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. बी. डी. माणगावे, प्रा. एस.एच. फलके, प्रा. पी. मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.