जिल्हा पान असोसिएशनची महापालिकेसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:36+5:302021-01-19T04:28:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खोक्यांचे रखडलेले पुनर्वसन, महापालिकेने केलेली भाडेवाढ, उपयोगकर्ता कराचा बोजा याविरोधात सोमवारी सांगली जिल्हा पान ...

जिल्हा पान असोसिएशनची महापालिकेसमोर निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खोक्यांचे रखडलेले पुनर्वसन, महापालिकेने केलेली भाडेवाढ, उपयोगकर्ता कराचा बोजा याविरोधात सोमवारी सांगली जिल्हा पान असोसिएशनने महापालिकेसमोर निदर्शने केली.
या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, कार्याध्यक्ष युसुफ जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. २००४ साली शहर खोकामुक्त करण्यासाठी संघटनेने महापालिकेला सहकार्य केले. आतापर्यंत दीड हजार खोक्यांचे पुनर्वसन झाले आहे. पण तत्कालिन राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी हटवलेल्या खोक्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. महापालिकेने तातडीने हे पुनर्वसनाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने खोकेधारक, छोट्या गाळेधारकांना विश्वासात न घेता दुप्पट भाडेवाढ केली आहे. त्यात उपयोगकर्ता कराचा बोजाही टाकला आहे. त्यामुळे खोकेधारकांची आर्थिक ओढाताण होत आहे. खोके हस्तांतरणाच्या फाईलही मालमत्ता विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यांचाही सोक्षमोक्ष लावावा तसेच हस्तांतरण फीमध्येही भरमसाठ वाढ केली आहे, ती कमी करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. महापालिकेने तातडीने संघटनेच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
फोटो ओळी : सांगली जिल्हा पान असोसिएशनने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. (छाया : नंदकिशोर वाघमारे)