मांगरूळच्या अंध अभयची डोळस प्रकाशवाट..!

By Admin | Updated: June 17, 2016 23:31 IST2016-06-17T23:07:20+5:302016-06-17T23:31:45+5:30

शिराळा कें द्रात प्रथम : सहावीपासून अंधपणा

Demonstrate the blind Abhayachi lurking light ..! | मांगरूळच्या अंध अभयची डोळस प्रकाशवाट..!

मांगरूळच्या अंध अभयची डोळस प्रकाशवाट..!

बाबासाहेब परीट -- बिळाशी  -बापजाद्याची इस्टेट म्हणून पदरात आलेले अंधत्व घेऊन तो शोधतोय प्रकाशवाट. त्याचे डोळे गेले, पण उमेद जिवंत आहे. प्रकाशाची उमेद घेऊन अंधळ्या डोळ्यांनी तो स्वप्न पाहतोय आयएएस होण्याचे. पेरू पाहतोय प्रकाश आणि कवेत घेऊ पाहतोय यशाचे शिखर. दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: अंध असणाऱ्या अभय वसंत कुंभार या शिराळा तालुक्यातला मांगरुळच्या युवकाने बारावीत कला शाखेत केंद्रात पहिला येऊन इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
मांगरुळ (ता. शिराळा) येथील अभय कुंभार याने यशवंत विद्यालयात व केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. सहावीपर्यंत सर्वसामान्य असणारा हा मुलगा घरी अभ्यासावेळी गणित सोडवत असताना, अचानक त्याच्या डोळ्यापुढे लाल गोळे दिसायला लागले आणि त्याला दिसायचे कमी आले. मिरज येथील रुग्णालयात गेल्यानंतर त्याच्या डोळ्याच्या रक्तवाहिन्या खराब झाल्याने त्याला अंधत्व आल्याचे परदेशातील ख्यातनाम डॉक्टरांनी सांगताच, त्याला रडू कोसळले. त्याचे डोळे फक्त उरले, अश्रूंपुरते. पण जिद्द न हारता त्याने पलूूस येथील धोंडीराम निवासी अंध विद्यालयात प्रवेश घेऊन एक वर्षात ब्रेल लिपी आत्मसात केली. गणितातील क्रिया, अंकवाचन तो शिकला. दहावीला त्याने ९०.८० टक्के गुण घेतले. लेखनिक घेऊन त्याने हे गुण मिळवले. बारावीला त्याने कॉलेजमधील ऐकीव ज्ञान, बे्रल लिपीतील पुस्तके वाचून अभ्यास केला. नालंदा अभ्यास केंद्रात तो दररोज अभ्यास करतो. अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तके वाचताना त्याला मर्यादा पडते.
अवांतर वाचनाची भूक मोठी असतानाही, अंधत्वामुळे त्याच्यावर मर्यादा येत आहेत. वीजपुरवठा खंडित झाला असला तरी, रात्री तो बे्रलमधील पुस्तके वाचतो.
त्याचे अंधत्व हे त्याने बहुस्थान केले आहे. कुणी तरी मित्र मोठ्याने वाचतो, ते हा ऐकतो. गावात स्वत: एकटा फिरतो. घरात स्वत:चे व्यवहार करतो. एसटीने प्रवास करताना त्याला अडचणी येतात. रिलायन्स फौंडेशनमार्फत निघणारे अंधांसाठीचे पाक्षिक तो वाचतो. नियमित बातम्या ऐकतो. पेपर वाचन करुन घेतो. त्याच्या वडिलांनाही अकाली अंधत्व आलंय.


मानसिक शक्तीच्या जोरावर तो उभा
भाऊ एका डोळ्याने अंध, तर हा दोन्ही डोळ्यांनी. शारीरिक अपंगत्व आलं असलं तरी, मानसिक शक्तीच्या बळावर तो उभा आहे, परिस्थितीशी दोनहोत करायला! युपीएससी आणि एमपीएससीचे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्याची चिकाटी सुरु आहे. बोलका संगणक मिळाला, तर त्याला यशाकडे जाण्यासाठी हातभार होईल. त्यासाठी उघड्या डोळ्यांनी जग पाहणाऱ्यांनी त्याच्याकडे आश्वासकपणे बघणे गरजेचे आहे.

Web Title: Demonstrate the blind Abhayachi lurking light ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.