लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या अतिथीगृहाची इमारत पाडण्यास अखेर वर्षभरानंतर मुहूर्त मिळाला. ही इमारत धोकादायक बनली होती. शहरातील खासगी इमारतीचे ऑडिट करणाऱ्या महापालिकेचीच इमारत धोकादायक बनल्याची टीकाही झाली होती. आता या जागेवर व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्याशेजारी महापालिकेची अतिथीगृहाची इमारत आहे. ही इमारत ४७ वर्षे जुनी असून, धोकादायक बनली आहे. स्लॅबचे अनेक ठिकाणी तुकडे होऊन पडले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही ही इमारत धोकादायक झाल्याने पाडण्याची शिफारस केली आहे. इमारतीची जागा सहा हजार चौरस फूट इतकी आहे. या इमारतीत महापालिकेचे जन्म-मृत्यू, मालमत्ता, विधी विभागाचे कामकाज केले जात होते, तसेच दर्शनी बाजूला व्यापारी गाळेही आहेत. गेल्या सात वर्षांपासून ही इमारत पाडून व्यापारी संकुल उभारण्यावर चर्चा होत होती.
गेल्या वर्षी महासभेत इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही प्रशासनाने निविदा काढली. आता प्रत्यक्षात इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर रस्ता बंद करण्यात आला आहे. इमारत उतरविण्यासाठी महिन्याभराची मुदत ठेकेदाराला देण्यात आली आहे.
चौकट
इमारत ४७ वर्षे जुनी
अतिथीगृहाची इमारत तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या काळात १४ एप्रिल १९७४ साली उभारण्यात आली होती. या इमारतीला ४७ वर्षे पूर्ण झाली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील बांधकाम खचले आहे. स्लॅब, छपऱ्याची पडझड झाली आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत. महापालिकेने ही इमारत धोकादायक ठरविली आहे. केवळ रंगरंगोटीशिवाय या इमारतीची दुरुस्ती केलेली नाही. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही इमारत पाडण्याचीच शिफारस केली होती.