शाळांमध्ये साहित्य विक्री थांबविण्याची मागणी
By Admin | Updated: August 26, 2014 22:20 IST2014-08-26T22:13:07+5:302014-08-26T22:20:27+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण शालेय साहित्य विक्रेता संघ

शाळांमध्ये साहित्य विक्री थांबविण्याची मागणी
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुरू असणारी शालेय साहित्याची विक्री थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण शालेय साहित्य विक्रेता संघाने जि. प.च्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.याबाबतचे निवेदन संघाचे पदाधिकारी नाना कांबळे (मिरज), मोहन पाटील, जगोध्दार पाटील (इस्लामपूर), विनायक मोहिते (मिरज) यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शालेय विक्रेता संघामार्फत शाळांमधून होत असलेल्या शालेय साहित्याची विक्री थांबविण्याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. मात्र ही साहित्य विक्री खुलेआमपणे व मनमानी पध्दतीने सुरुच आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. मात्र अशा शाळांविरुध्द कोणतीही कारवाई झालेली नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांच्या संबंधितांनाच अशा प्रकारची साहित्य विक्री करण्याची परवानगी दिली जाते, असेही आढळून आले आहे. शाळांमधून अशी मनमानी पध्दतीने साहित्य विक्री करण्यासाठी शासनाची परवानगी नाही. या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानितसह वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांना साहित्य विक्री बंद करण्याबाबतचे सक्त आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. शालेय साहित्य विक्रीला बंदी न घातल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विक्रेता संघाने दिला आहे. यावेळी कांतिलाल कोठारी, जितूभाई शहा, सचिन शहा (माधवनगर), सदाशिव माळी, शंकरराव जाधव, संतोष पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शाळांमधून कोणत्याही शालेय साहित्याची विक्री करण्यासाठी शासनाकडून कसलीही परवानगी दिली जात नाही. शालेय विक्रेता संघ अथवा पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करुन, दोषी आढळणाऱ्या शाळांविरुध्द कारवाई केली जाईल.
- अजिंक्य कुंभार, कक्ष अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग.