अन्न सुरक्षा योजनेच्या आढाव्याची मागणी
By Admin | Updated: October 26, 2014 23:27 IST2014-10-26T22:14:19+5:302014-10-26T23:27:40+5:30
अनियमितता : महिन्याचे धान्य नाही

अन्न सुरक्षा योजनेच्या आढाव्याची मागणी
सांगली : काँग्रेसच्या केंद्रीय आघाडी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहिल्यामुळे लाभार्थ्यांचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्न सुरक्षा योजनेमधून पात्र केशरी (दारिद्र्यरेषेवरील) शिधापत्रिकाधारक वंचित राहिले आहेत. या महिन्याचे तर अद्याप धान्यच रेशनवर आलेले नाही.
सर्वांना अन्नाचा हक्क मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. सांगली जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. केंद्राच्या आदेशामुळे घाईगडबडीने याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाला कमी कालावधी दिला. केवळ महिन्याभरात पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बनविण्यात आल्या. प्रशासनाने हे काम स्वस्त धान्य दुकानदारांकडे सुपूर्द केले. दुकानदारांनी दुकानांमध्ये बसूनच या याद्या तयार केल्या. पुरवठा निरीक्षकांनी घरोघरी भेट देऊन पात्र लाभार्थ्यांची यादी बनविणे आवश्यक असताना, तशी शोधमोहीम राबविण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
धान्य वितरण अनियमित
अन्न सुरक्षा योजनेसाठी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के व शहरी भागातील ४५.३४ टक्के एकूण शिधापत्रिकांपैकी लाभार्थी ठरविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत माणसी पाच किलो धान्य देण्यात येते. यामध्ये ३ किलो गहू २ रुपये किलोने व २ किलो तांदूळ ३ रुपये किलोने देण्यात येतो. धान्य वितरणाचे प्रमाण मात्र अनियमित असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.