ऑक्सिजनची मागणी २५ टन, तर पुरवठा १५ टनांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:41+5:302021-04-18T04:25:41+5:30

सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. ऑक्सिजनची उपलब्धता आणि मागणीतील ...

Demand for oxygen is 25 tons and supply is 15 tons | ऑक्सिजनची मागणी २५ टन, तर पुरवठा १५ टनांचा

ऑक्सिजनची मागणी २५ टन, तर पुरवठा १५ टनांचा

सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. ऑक्सिजनची उपलब्धता आणि मागणीतील तफावतीमुळे पुरवठ्यात अडचणी येत आहेत. तो मिळवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली असून उपलब्धतेतील अडचणी प्राधान्याने दूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सध्याची रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य यंत्रणेसह सर्वांची कसोटी पाहणारी आहे. रुग्णांची संख्या वाढली असतानाच ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे. त्यासाठी आता राज्यपातळीवरून वाढीव पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यात वाढ होईल. कडक निर्बंध व कोरोनाविषयक उपाययोजनांचे प्रत्येकाने पालन करावे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातून बाहेर न पडणे, गर्दी न करणे व मास्कचा नियमित वापर आवश्यक आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे.

चौकट

जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मितीसाठी नियोजन करा

ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने आता जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मितीसाठी नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या १५ टन ऑक्सिजन उपलब्ध हाेत आहे, तर मागणी मात्र, २५ ते ३० टनांपर्यंत जाऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्मितीसाठी आता विशेष प्रयत्न करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

चौकट

रेमडेसिविरचा अनावश्यक वापर नको

पालकमंत्री पाटील म्हणाले की, ज्या रुग्णांना आवश्यक असेल, त्याच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे. त्याचा अनावश्यक वापर टाळल्यास आवश्यकता असलेल्या रुग्णांना त्याचा उपयोग होईल. जिल्ह्यात रेमडेसिविरची उपलब्धता वाढविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

Web Title: Demand for oxygen is 25 tons and supply is 15 tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.