नवीन रेल्वे सेवा व माल वाहतूक शेडची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:53+5:302021-06-16T04:34:53+5:30
सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून देशांतर्गत रेल्वे सेवा सुरू असल्या तरी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून काही नवीन रेल्वे सेवा सुरू करणे ...

नवीन रेल्वे सेवा व माल वाहतूक शेडची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
सांगली : महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतून देशांतर्गत रेल्वे सेवा सुरू असल्या तरी प्रवाशांच्या दृष्टिकोनातून काही नवीन रेल्वे सेवा सुरू करणे तसेच कर्नाटकातील शेडबाळ रेल्वे स्थानकाजवळ नवीन वाहतूक शेडची उभारणी गरजेची आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती व्हिजन सांगली फोरमचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, शेडबाळ रेल्वे स्थानकाच्या जवळपास अनेक साखर कारखाने, मका प्रक्रिया कारखाने आहेत. त्यामुळे माल वाहतुकीच्या हालचालींमुळे हे रेल्वे स्थानक अतिशय व्यस्त बनले आहे. सध्या ऊस, मका, सिमेंट आणि खते यांची वाहतूक जवळील मिरज रेल्वे स्थानकातून केली जाते. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. यासाठी शेडबाळ रेल्वे स्थानकाजवळ नवीन माल वाहतूक शेडची उभारणी गरजेची आहे. या शेडमध्ये माल भरणे आणि उतरणे यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. प्लॅटफॉर्मसह संपूर्ण सुरक्षित माल वाहतूक शेडची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.
बेंगलोर - नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसचा मार्ग बेळगाव, मिरज, पंढरपूर, दौंड, नवी दिल्ली असा करावा, बेळगाव ते बेंगलोर रेल्वे सेवा मिरज जंक्शनपर्यंत वाढवावी. बेळगाव ते पुणे या मार्गावर नवीन इंटरसिटी रेल्वे सुरू करावी तसेच सध्याची म्हैसूर ते धारवाड रेल्वे सेवा मिरज जंक्शनपर्यंत वाढवावी, आदी मागण्याही केल्याचे त्यांनी सांगितले.