गणपती संघाची मागणी फेटाळली
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T23:37:02+5:302015-04-28T23:44:31+5:30
उच्च न्यायालयाचा निर्णय : ‘डीआरएटी’च्या आदेशालाही स्थगिती

गणपती संघाची मागणी फेटाळली
भिलवडी : तुरची येथील तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीप्रकरणी कर्जाच्या पंचवीस टक्के रक्कम अवसायकांनी आठ आठवड्यांत जमा करावी, या ऋणवसुली अपिलीय अधिकरणाच्या (डीआरएटी) आदेशाला पुढील सुनावणी होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत, डीआरएटीमध्ये कोणतेही न्यायालयीन कामकाज करण्यास मनाई करीत, वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याचे कारण पुढे करून सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी गणपती जिल्हा संघाची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मंगळवारी तासगाव कारखाना विक्रीप्रकरणी झालेल्या सुनावणीची माहिती कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती गणपती जिल्हा संघाच्यावतीने अॅड. आशिष कुलकर्णी यांनी केली. अवसायकांनी पंचवीस टक्के रक्कम भरण्याच्या आदेशाला स्थगिती देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
अवसायकांच्यावतीने अॅड. उमेश माणकापुरे यांनी कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यापासूनची सर्व माहिती व घडामोडी न्यायालयासमोर मांडल्या. कारखान्याच्या मालमत्ता राज्य सहकारी बॅँकेच्या ताब्यात असून, भाडेकरारापोटी ‘उगार शुगर’कडून सहा कोटी व गणपती संघाकडून दहा कोटी अशी एकूण सोळा कोटी रक्कम बॅँकेकडे जमा करण्यात आली आहे.