शाळा तुकड्यांचा निधी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:57+5:302021-01-18T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील घोषित, अघोषित विनाअनुदानित तुकड्यांचा निधी देण्याबाबत तातडीने आदेश द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन ...

शाळा तुकड्यांचा निधी देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील घोषित, अघोषित विनाअनुदानित तुकड्यांचा निधी देण्याबाबत तातडीने आदेश द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. अरविंद जैनापुरे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जैनापुरे व त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, २० व ४० टक्के घोषित, अघोषित विनाअनुदानित तुकड्यांचा निधी वितरणाचा आदेश त्वरित काढण्यात यावा. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या दहा, वीस, तीस वर्षाच्या सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी सुधारित आश्वासित प्रगती योजना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी. शिक्षकांना निवडणुकीव्यतिरिक्त कोणतेही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये. तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदानित, अर्धवेळ व पूर्णवेळ सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी वर्षा गायकवाड यांनी घोषित, अघोषित तुकड्यांच्या निधी वितरणाचा आदेश तपासणीनंतर त्वरित काढण्यात येईल. तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मुंबईमध्ये एक बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.