खानापूर तालुक्यात २८ गावांमध्ये चारा डेपोची मागणी
By Admin | Updated: September 8, 2015 22:41 IST2015-09-08T22:41:29+5:302015-09-08T22:41:29+5:30
दुष्काळाची दाहकता : चाऱ्याचा प्रश्न गंभीर, टॅँकरने पाणी पुरवठा, तलाव कोरडे

खानापूर तालुक्यात २८ गावांमध्ये चारा डेपोची मागणी
दिलीप मोहिते - विटा खानापूर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून, चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील २८ गावांनी प्रशासनाकडे चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ११ गावांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, अजून दोन गावांची टॅँकरची मागणी प्रशासनाने प्रलंबित आहे.
खानापूर तालुक्यात जून २०१५ पासून आजअखेर चार महिन्यांत केवळ ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अल्प ओलीवर शेतकऱ्यांनी केलेली खरीप पेरणी पूर्णपणे वाया गेली आहे. खानापूर तालुक्यात ८ हजार ५६४ लहान व २७ हजार ६९८ मोठी अशी एकूण ३६ हजार २६२ जनावरांची संख्या आहे. या जनावरांना प्रतिदिन ४६२ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. परंतु, तालुक्यात सध्या १ हजार १९४ टन चारा उपलब्ध आहे. हा उपलब्ध चारा अवघ्या दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे तालुक्यात चारा छावण्यांऐवजी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली असून, तालुक्यातील २८ गावांनी याबाबतचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले आहेत.
खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, बाणूरगड, घाडगेवाडी (कुर्ली), चिंचणी-मंगरूळ, वेजेगाव, घानवड, जोंधळखिंडी, भवरवाडी (भिकवडी बुद्रुक), बामणी व घोटी बुद्रुक या ११ गावातील १८ हजार लोकसंख्येला टॅँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. भिकवडी बुद्रुक व करंजे या गावांची पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. तालुक्यातील १४ गावातील कूपनलिका व विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
या गावांनी केली चारा डेपोंची मागणी...
खानापूर तालुक्यातील विटा, माहुली, नागेवाडी, पारे, बामणी, कार्वे, गार्डी, खानापूर, पोसेवाडी, ऐनवाडी, घोटी खुर्द, जाधववाडी, रेवणगाव, रेणावी, लेंगरे, वेजेगाव, भिकवडी बुद्रुक, साळशिंगे, मादळमुठी, भेंडवडे, करंजे, देविखिंडी, पळशी, धोंडेवाडी, बलवडी (खा.), बेणापूर, हिवरे व सांगोले या २८ गावांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्यांऐवजी चारा डेपोची मागणी केली असून, त्याबाबतचे प्रस्ताव तहसीलदार अंजली मरोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.
खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होईल, त्या गावात तातडीने टॅँकर सुरू करण्यात येतील.
- अंजली मरोड,तहसीलदार, विटा.