मिरज : मिरज न्यायालय दोन वर्षांपूर्वी सांगलीतील राजवाडा चौकात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. मात्र पक्षकारांसह वकिलांना कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने मिरज न्यायालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मिरज शहर सुधार समितीने जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सांगलीतील राजवाडा चौक हा पूरपट्ट्यात असून येथील न्यायालयाची इमारत गेल्या पंधरा वर्षांत तीन वेळा पुराच्या पाण्याने होती. मिरज न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात मिरज शहर व पूर्व भागातील ५१ गावांचा समावेश आहे. सुमारे ५० किलाेमीटर अंतरावरून मिरजेतून सांगलीतील न्यायालयात पक्षकारांना यावे लागत आहे.
पक्षकारांना महिला पक्षकार, वकील व शासकीय कर्मचाऱ्यांना न्यायालयात कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. न्यायालयात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लहान बाळांच्या स्तनपानासाठी महिलांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम, न्यायालय आवारात वाहन पार्किंग व्यवस्थेची सोय करण्याची मागणी समितीने केली आहे. या वेळी समितीचे संस्थापक ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, बाळासाहेब पाटील, मुस्तफा बुजरूक, मनोहर कुरणे, श्रीकांत महाजन यांच्यासह सदस्य उपस्थित होते.