संख परिसरातील कृषी अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:10+5:302021-03-30T04:16:10+5:30
संख : संख (ता. जत) येथील शेतकऱ्यांचे तीन वर्षांचे फळबाग लागवडीचे अनुदान तत्काळ देण्यात यावे. संख कृषी सहायकाची चौकशी ...

संख परिसरातील कृषी अनुदानाची मागणी
संख : संख (ता. जत) येथील शेतकऱ्यांचे तीन वर्षांचे फळबाग लागवडीचे अनुदान तत्काळ देण्यात यावे. संख कृषी सहायकाची चौकशी करून नवीन कृषी सहायकाची नियुक्ती करावी या मागणीचे निवेदन बहुजन समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी कृषी अधिकारी हणमंत मेडदार यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, सन २०१८-२०१९ ते २०१९-२०२० व २०२०-२०२१ मधील फळबागा लागवड केलेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचे तीन वर्षांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. शासनाकडून अनुदान आलेले नाही. कोरोनाचे कारण सांगितले जात आहे. ते अनुदान तत्काळ जमा करण्यात यावे.
संख येथे असलेले कृषी कार्यालय बंद आहे. कार्यालयाची अवस्था 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे. हे कार्यालय तत्काळ सुरू करून कृषी सहायकास हजर राहण्याचे आदेश द्यावेत. कृषी सहायकाच्या कामाची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांची अन्य ठिकाणी बदली करून कायदेशीर कारवाई करावी.
त्याठिकाणी नवीन कृषी सहायकाची नेमणूक करावी. मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात, अन्यथा संख येथील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसमवेत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.