अल्पवयीन चालकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:38+5:302021-05-30T04:22:38+5:30
पाण्याची बचत करा सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी ...

अल्पवयीन चालकांवर कारवाईची मागणी
पाण्याची बचत करा
सांगली : शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक नळाला तोट्या लावल्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी पाण्यास गळती असूनही त्याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे लक्ष जात नाही. यामुळे पाणी वाया जात आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
सांगली : शासनाने लाखो रुपये खर्च करून, येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली आहेत. मात्र, शासकीय अधिकारी, कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने, देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये खुले भूखंड आहेत. मात्र, काही मोजक्याच खुल्या भूखंडांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या भूखंडाला संरक्षण भिंत नाही, तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. प्रशासनाने शहरातील सर्वच खुले भूखंडांचा विकास करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
सांगली : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा
सांगली : शहरातील आंबेडकर रस्ता, स्टेशन चौक, शंभर फुटी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने, वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
गादी व्यावसायिक आले अडचणीत
सांगली : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई बंद पडली आहे. लॉजिंग, वसतिगृहही बंद आहे. त्यामुळे गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा गाडा हाकलणे कठीण झाले असून, आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
कर्ज वसुली थांबविण्याची मागणी
करगणी : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.