शिराळा : शिराळा शहरासह रेड, खेड आदी पूर्वभागात बुधवारी परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायद्याचा असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पूर्ण दडी मारलेल्या पावसाने बुधवारी चारच्यादरम्यान हजेरी लावली. शिराळा तालुका पावसाचे आगार समजले जाते, मात्र यावर्षी पावसाची अवकृपाच झाली. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. आधीपासूनच १७ तलाव कोरडे पडले आहेत, तर इतर तलावात ५० टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी चिंतेत आहे. बुधवारी शिराळा शहरासह रेड, खेड आदी तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसाने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. सध्या गोरखनाथ मंदिरात असलेल्या नवनाथ झुंडीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गोरखनाथ मठाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये ४५० साधूमहंतांनाही पावसात उभे रहावे लागले आहे. यावेळी आयोजकांनी मंडपावर ताडपदरी टाकून त्यांना आधार दिला. या झुंडीच्यानिमित्ताने अनेक व्यावसायिक दाखल झाले होते. परिसरातील मिठाईवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. (वार्ताहर)
परतीच्या पावसाने शिराळ्यात दैना
By admin | Updated: December 3, 2015 00:49 IST