सांगली : आजीबाईंचा बटवा म्हणजे सहज उपलब्ध होणारे घरगुती आयुर्वेदिक उपाय. अनेक पिढ्यांपासून असे घरगुती उपचार लाभदायी ठरत आले आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पती किंवा घरातील वापराचे मसाल्याचे पदार्थ यांचा वापर करूनही कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न आता अनेक जण करीत आहेत. त्यामध्ये काढ्याचा उपयोग सर्वाधिक प्रमाणात होत आहे. आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा, असा संदेश यातून दिला जात आहे.
सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर व विदेशातही आजीबाईंचा बटवा काम करीत आहे. त्यामुळेच काढ्यासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी जगभरात वाढली आहे. यामध्ये हळद, मध, लिंबू, अडुळसा, कडुलिंब यासह अन्य मसाल्यांचा वापर कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शरीरातील ऑक्सिजन वाढविण्यापासून रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्याही अनेक वनस्पती व त्यापासून बनविलेले काढे, औषध आज वापरले जात आहेत. काही राज्यांमध्ये आजीबाईंच्या बटव्यातील उपचाराला परवानगीही मिळाली आहे. कोणतेही साइड इफेक्ट नसणाऱ्या या बटव्यातील उपचारांना त्यामुळेच अधिक पसंती मिळत आहे.
चौकट
पाच हजार वर्षांपूर्वीपासून आयुर्वेद काम करीत आहे. अनेक व्याधी दूर करून लोकांना अधिक सुदृढ करण्याचे कामही या औषधांनी केले आहे. पिढ्यान्पिढ्या आजीबाईंचा बटवा चालत आला आहे. काढे पिऊन आजार पळवून लावण्याचे काम अनेकांनी केले. कोरोनाकाळात ॲलोपॅथिकसोबत आयुर्वेदिक उपचाराला परवानगी मिळाल्यास कोविडवरील उपचाराचा ताण कमी होऊ शकतो.
-डॉ. शिवकांत पाटील, आयुर्वेदिकतज्ज्ञ, सांगली
कोट
खोकला आला की, आले घालून चहा पिते. ताप आला की, माडगे करते. तुरीच्या कण्या खाणे, डोके दुखत असेल, तर सुपारी उगाळून लावणे, अशा अनेक गोष्टी करीत आले आहे. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टरांकडेही जावे लागले नाही.
-इंदूताई कांबळे, आंबेडकरनगर, सांगली
कोट
पूर्वी आम्ही किरकोळ आजारांसाठी काढे करून घेत होतो. कडुलिंब, हळद, मध यांचा वापर अनेक पिढ्यांनी केला. त्याचा चांगला उपयोग झाला. पूर्वीच्या कसदार खाण्यामुळेही आमचे शरीर आम्हाला वयाच्या पंचाहत्तरीतही चांगल्या पद्धतीने साथ देत आहे.
-पुष्पावती चव्हाण, सांगली
कोट
पूर्वी पोटोत दुखत असल्यास ओवा खायला दिला जायचा. त्याचा उपयोग होत होता. ताप आल्यानंतर माडगे दिले जायचे. असे अनेक उपाय पूर्वीपासून केले जात आहेत. त्याचा फायदाही होतो. हळद, मधाचा, तर आम्ही नेहमीच वापर करतो.
-उदय माळी, सांगली
चौकट
कशाचा काय फायदा...
अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधी तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यावर देतात.
कडुलिंबाच्या पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून, यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडुलिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. याच्या खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून, त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात. पाने वातशामक असून, त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो.
घराघरांतील किचनमध्ये सहज मिळणारी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करताना वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. फार पूर्वीपासूनच हळद डायबिटीस, लिव्हरची समस्या, पिंपल्स आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये असलेले कॅल्शिअम, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.