आरोपपत्रावरील सुनावणी लांबणीवर?

By Admin | Updated: October 6, 2015 00:40 IST2015-10-05T23:14:40+5:302015-10-06T00:40:57+5:30

जिल्हा बँक : चौकशी अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Deferred hearing on the charge sheet? | आरोपपत्रावरील सुनावणी लांबणीवर?

आरोपपत्रावरील सुनावणी लांबणीवर?

सांगली : जिल्हा बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रावरील सुनावणी न्यायालयीन सूचनेनुसार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. चौकशी अधिकारी संपतराव गुुंजाळ यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने याकडे माजी संचालक, वारसदार व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी यातील बहुतांश माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मुंबई उच्च न्यायालयात गत आठवड्यात सुनावणी झाली असली, तरी न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी ८ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. माजी संचालकांनी, चौकशी अधिकाऱ्यांची सुनावणी ६ आॅक्टोबरला असल्याने त्यापूर्वी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. न्यायालयाने, याचिकेवरील निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचना केली. त्यामुळे आता ६ आॅक्टोबररोजी होणारी सुनावणीही लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

९६ पानी आरोपपत्र -जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा यात समावेश आहे.

Web Title: Deferred hearing on the charge sheet?