सांगली : जिल्ह्यातील ताडीच्या दुकानांची लिलाव प्रक्रिया थांबविण्याची मागणी बंडखोर सेनेने केली. उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन दिले. उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेली लिलाव प्रक्रिया सदोष असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली.
संघटनेचे अध्यक्ष नीलेश मोहिते यांच्यासह मधुकर कांबळे, शिवाजी पांढरे, बंडू चौगुले आदींनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात ताडीच्या झाडांच्या प्रमाणात दुकानांची संख्या नाही. यापूर्वीदेखील दुकानांचे लिलाव जाहीर करताना झाडांची बोगस संख्या दाखविण्यात आली होती. सध्यादेखील चुकीच्या बेकायदेशीर पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू आहे. शासन नियमानुसार ज्या तालुक्यात ताडीची १०० पेक्षा जास्त झाडे आहेत, त्याच तालुक्यात दुकानांना परवाने देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात तशी संख्या कोणत्याही तालुक्यात दिसत नाही. त्यामुळे सध्याची लिलाव प्रक्रिया चुकीची आहे. ती त्वरित थांबवावी. अन्यथा आंदोलन केले जाईल.