‘बीओटी’चा डाव उधळल्याने बदनामी
By Admin | Updated: April 23, 2015 00:37 IST2015-04-22T23:47:54+5:302015-04-23T00:37:04+5:30
विवेक कांबळे : स्वकीयांना घरचा आहेर; माजी महापौरांच्या काळातच भानगडी

‘बीओटी’चा डाव उधळल्याने बदनामी
सांगली : महापालिका क्षेत्रातील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह, मजलेकर पेट्रोल पंप, जयश्री टॉकीजच्या जागेवर बीओटी करण्याचा डाव काही सदस्यांनी आखला होता. त्याला आपण विरोध केल्यानेच बदनामी सुरू आहे, असा घरचा आहेर बुधवारी महापौर विवेक कांबळे यांनी स्वकीयांना दिला. महासभेच्या इतिवृत्तात भानगडीचे विषय घेतलेले नसून नागरी हितालाच प्राधान्य दिले आहे. ऐनवेळच्या ठरावाच्या प्रती प्रत्येक नगरसेवकाला देणार आहोत. उलट माजी महापौरांच्या काळातच अनेक भानगडी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
दोन दिवसापूर्वी महासभेत ऐनवेळचे ठराव घुसडल्यावरून हाणामारी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कांबळे यांनी बुधवारी पत्रकारांना इतिवृत्त दाखविले. १७५ ते १७८ क्रमांकाचे ठराव एक (ज) खालील असून १७४ पूर्वीचे ठराव ऐनवेळी घेण्यात आले आहेत. हे विषयही भानगडीचे नाहीत, असे सांगत विवेक कांबळे म्हणाले की, काही सदस्यांनी तीन जागा बीओटी करण्याचा घाट घातला आहे. त्यात सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह, मजलेकर पेट्रोल पंप, जयश्री टॉकीजच्या मागील जागेचा समावेश आहे. पक्षांची व नेत्यांची बदनामी होऊ नये, यासाठी आपण या विषयावर आतापर्यंत गप्प होतो. या बीओटीला माझा विरोध असल्याने या मंडळींनी बदनामी सुरू केली आहे. या मंडळींनी सत्ताधारी गटातील सदस्य व विरोधकांत गैरसमज पसरवला आहे, असेही ते म्हणाले.
महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ऐनवेळच्या ठरावात कोणत्याही भानगडी केलेल्या नाहीत. तरीही विरोधकांकडून साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार सुरू आहे. नागरी हिताचेच ठराव महासभेत केले आहेत. कोणत्याहीक्षणी महासभेचे इतिवृत्त जाहीर करण्याची तयारी आहे. त्यांच्या मिरज पॅटर्नला माझा विरोध कायम राहील. मजलेकर पेट्रोल पंपाच्या जागेवर वाद झाला. वस्तुत: ही जागा गेल्या काही वर्षापासून पडून आहे. ती महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याचा रेडीरेकनर दराने नव्याने लिलाव काढण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
महासभेतील ऐनवेळच्या ठरावाच्या सत्य प्रती नगरसेवकांना देणार आहोत. महासभेतील गोंधळाबाबत माजी मंत्री मदन पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असल्याचेही विवेक कांबळे म्हणाले. (प्रतिनिधी)
जामदार, मेंढेंकडून गैरकारभार
बीओटीच्या भानगडी कोण करते, हे साऱ्यांनाच माहिती आहे. मी एलबीटी वसुलीसाठी प्रयत्नशील आहे. माझ्याकडे एलबीटी, तर त्यांच्याकडे बीओटी आहे, असा टोला कांबळे यांनी लगावला. माजी महापौरांच्या शेवटच्या सभेत ऐनवेळचे ठराव करण्यात आले आहेत. त्यात पटेल चौकातील सिंधी मार्केटला कवडीमोल दराने भाडेपट्टी आकारणी, एका माजी पदाधिकाऱ्याला नुकसानभरपाई, असे अनेक वादग्रस्त ठराव केले आहेत. नेत्यांची बदनामी होऊ नये, यासाठी या विषयावर आपण बोललो नाही. या साऱ्या भानगडीमागे गटनेते किशोर जामदार व सभापती संजय मेंढेच आहेत. त्यांच्या कारभाराला विरोध केल्यानेच आता ते महासभा उधळू पाहात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
इद्रिस नायकवडी सक्रिय
माजी महापौर इद्रिस नायकवडी महापालिकेच्या कारभारापासून सध्या दूर आहेत. काँग्रेसअंतर्गत वादामुळे आता पुन्हा त्यांना पालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी साकडे घातले जात आहे. तसे संकेतही महापौरांकडून देण्यात आले. जयंत पाटील यांच्या विकास महाआघाडीला नायकवडी यांनी दणका दिला होता.