लोकवर्गणीतून माणगंगेचे खोलीकरण, रुंदीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:48+5:302021-03-30T04:17:48+5:30

आटपाडी : लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा नदीपात्रातील झाडे, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आटपाडी तालुक्यातील ...

Deepening and widening of Mangange started from the population | लोकवर्गणीतून माणगंगेचे खोलीकरण, रुंदीकरण सुरू

लोकवर्गणीतून माणगंगेचे खोलीकरण, रुंदीकरण सुरू

आटपाडी : लोकवर्गणी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माणगंगा नदीपात्रातील झाडे, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी ते राजेवाडीपर्यंतचे नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी सद्गुरू श्री श्री साखर कारखाना (राजेवाडी) आणि माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था (सांगोला) यांच्या वतीने माणगंगा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे.

माणगंगा नदी शिखर शिंगणापूर येथील डोंगरातून उगम पावते. तेथून म्हसवड, राजेवाडी, दिघंची, कौठूळी, नाझरे, सांगोला यामार्गे वाहते. नदीचा उगम ते शेवट १५३ किलोमीटरचा प्रवास आहे. नदीचे पात्र विस्तृत आणि खोल आहे. दुष्काळी भागाला नदीचे वरदान मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे माणगंगा नदी कोरडी पडत चालली आहे. सांगोला येथील माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे आणि स्वयंसेवकांनी नदी प्रवाहित करण्यासाठी दोन वेळा पायी प्रवास करून नदीचा अभ्यास केला. यातून माणगंगा नदी पुनरुज्जीवित करण्याचा अभ्यास करून पूर्ण प्रकल्प तयार केला आहे.

नदी पुनरुज्जीवित कामाचा खर्च सद्गुरू श्री श्री साखर कारखाना चाळीस टक्के आणि माणगंगा भ्रमण सेवा बहुउद्देशीय संस्था ६० टक्के करणार आहे. सांगोला तालुक्यातून काम करत आटपाडी तालुक्यापर्यंत आले आहे. आटपाडी तालुक्यात खानजोवाडी ते राजेवाडी या २२ किलोमीटरचे काम एका महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये नदीपात्राचे खोलीकरण आणि सरळीकरण केले जाणार आहे. नदीपात्रात आणि कडेला वाढलेली चिलार झाडे काढून पात्र स्वच्छ केले जाणार आहे.

बावीस किलोमीटरमधील सात बंधाऱ्यातील गाळ शेतकऱ्यांना मोफत भरून दिला जाणार आहे. माणगंगा पुनरुज्जीवित उद्घाटनावेळी आमदार अनिल बाबर यांनी डिझेलसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून पाच लाख रुपये मंजुरीचे पत्र दिले तसेच स्वतः ५१ हजार मदतीचा धनादेश संस्थेकडे सोपवला.

यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, सद्गुरू कारखान्याचे अध्यक्ष शेषागिरी राव, वैजनाथ घोंगडे, धनंजय पाटील, राजू वाघमारे उपस्थित होते.

Web Title: Deepening and widening of Mangange started from the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.