पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:27+5:302021-05-14T04:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील वृत्तपत्र व विविध दृकश्राव्य माध्यमातील सर्व पत्रकार व कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाइन वर्कर्स ...

पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील वृत्तपत्र व विविध दृकश्राव्य माध्यमातील सर्व पत्रकार व कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. कोरोना काळात पत्रकार समोर येऊन कार्य करीत असताना अनेक पत्रकार कोरोनाबाधित झाले आहेत. काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे. देशातील सुमारे १२ राज्यात मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात हा निर्णय प्रलंबित आहे. राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटना याबाबत मागणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी ऑनलाइन माध्यमातून सांकेतिक आंदोलन केले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो आहोत. दुसऱ्या लाटेत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या अधिक आहे. अशातच त्यांच्या जिवाची व सुरक्षेची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित केल्यास लसीकरणात प्राधान्य मिळेल.
या कोरोनाच्या काळात रुग्णालयात, स्मशानभूमीत जाऊन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार काम करत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यातही पत्रकारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकार व कॅमेरामन यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी अतुल माने, मकरंद म्हामूलकर उपस्थित होते.