महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट निविदेवर मंगळवारी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:48+5:302021-05-22T04:25:48+5:30
सांगली : कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली ...

महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट निविदेवर मंगळवारी निर्णय
सांगली : कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. या निविदेवर मंगळवारी स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच नेमिनाथनगर येथील प्रस्तावित चिल्ड्रेन पार्कसाठी १३ टक्के कमी दराच्या निविदेस मान्यतेचा विषयही सभेसमोर आहे.
महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट उभारणीचा विषय स्थायी समिती सभेपुढे आहे. पुणे येथील एका कंपनीची ७४ लाखांची निविदा आहे. मुदतवाढ देऊनही एकच निविदा आल्याने या निविदाधारकांकडून प्लाँट उभारणी व खर्चास मान्यतेचा विषय सभेपुढे आला आहे. महापालिकेच्या नुकतेच झालेल्या महासभेत ९० लाखांचा चिल्ड्रेन पार्क चर्चेत आला होता. अखेर नेमिनाथनगर येथे चिल्ड्रेन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायी समितीपुढे आला आहे. भोपाळच्या एका कंपनीची अंदाजपत्रकीय दरापेक्षा १३.१० टक्के कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे आली आहे.
पाणीपुरवठा देखभालीसाठी नवीन एजन्सी नियुक्तीपर्यंत गेल्यावर्षीच्या ठेकेदारास अंदाजपत्रकापेक्षा एक टक्का कमी दराने काम करण्यास व खर्चास मान्यतेचा विषय तसेच महापालिका क्षेत्रातील रस्ते पॅचवर्क करण्यासाठी ५४ लाखांचे दोन व्हायब्रेटर रोडरोलर खरेदीस मान्यता देण्याचा विषयही सभेपुढे आला आहे.
६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिव्यांच्या निविदापूर्व बैठकीमध्ये मक्तेदारांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे व दुरुस्त्या वेगवेगळ्या शुद्धीपत्रकान्वये प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याबाबत स्थायी समिती सभेत चर्चा होणार आहे. लाचप्रकरणी निलंबित महापालिकेचे उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद कोरे यांचे अपील स्थायी समिती सभेपुढे आले आहे. त्यावर स्थायी समिती सभेत निर्णय होणार आहे.