शिक्षक पुरस्कारासाठी आणखी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:16+5:302021-09-03T04:27:16+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या २० आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी फक्त २२ प्रस्ताव आले, त्यामुळे निवडप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय गुरुवारी झाला. ...

शिक्षक पुरस्कारासाठी आणखी प्रस्ताव मागविण्याचा निर्णय
सांगली : जिल्हा परिषदेच्या २० आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी फक्त २२ प्रस्ताव आले, त्यामुळे निवडप्रक्रिया पुन्हा राबविण्याचा निर्णय गुरुवारी झाला. पुरस्कार प्रक्रियेविषयी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या दालनात बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह शिक्षण सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत दहा आदर्श शिक्षक व दहा गुणवंत शिक्षक पुरस्कार दिले जातात. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुरस्कारांसाठी शिक्षकांनी बरेच डावपेच केले. वशिले लावले. त्यामुळे वीस पुरस्कारांसाठी फक्त २२ प्रस्तावच जिल्हा परिषदेत पोहोचले. मोजकेच प्रस्ताव आल्याने त्यात स्पर्धात्मकता राहिली नाही. याची बरीच चर्चाही झाली. यावर विचार करण्यासाठी गुरुवारी बैठक झाली. पुरस्कारांत पारदर्शीपणा असावा, स्पर्धात्मकता असावी, तसेच खरोखरच पात्र शिक्षकांना पुरस्कार मिळावेत, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सध्याची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला. प्रत्येक तालुक्यातून आणखी प्रस्ताव मागवावेत आणि त्यानंतरच शिक्षकांच्या निवडी कराव्यात, असा निर्णय झाला. त्यानुसार आता १५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक प्रस्ताव दाखल करू शकतील. त्यातून पुरस्कारार्थी निवडले जाणार आहेत.