इस्लामपुरात ‘कडकनाथ’मुळे कर्जबाजारी महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:38+5:302021-01-13T05:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आठ लाखांचे नुकसान झालेल्या कुटुंबातील महिलेने कर्जबाजारीपणास कंटाळून कीटकनाशक प्राशन ...

इस्लामपुरात ‘कडकनाथ’मुळे कर्जबाजारी महिलेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आठ लाखांचे नुकसान झालेल्या कुटुंबातील महिलेने कर्जबाजारीपणास कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही महिला येथील अजिंक्यनगर परिसरातील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या परिसरात वास्तव्यास होती. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. नंदा हंबीरराव साळुंखे (वय ४५) असे तिचे नाव आहे.
दीड वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात नंदा साळुंखे यांनी सात लाख ७२ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कर्ज काढून ही गुंतवणूक केली होती. त्यामुळे कुटुंबामध्ये आर्थिक ताण-तणाव निर्माण झाला होता.या कर्जबाजारीपणाचा त्रास असह्य झाल्याने रविवारी रात्री त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब येताच साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार घेत असताना रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती शासकीय रुग्णालयाच्या डॉ. प्रियांका गुरव यांनी पोलिसांना दिली.
कोट
कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आमची ८ ते १० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली आहे. लवकरच आम्ही कडकनाथ घोटाळ्याशी संबंधितांविरुद्ध तक्रार करणार आहोत.
- अमृत हंबीरराव साळुंखे, मृत महिलेचा मुलगा
कोट
कडकनाथ घोटाळ्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार खुलेआमपणे फिरत आहेत. या घोटाळ्यातील सर्वांचे हितसंंबंध चव्हाट्यावर आणणार आहोत.
- कॉ. दिग्विजय पाटील, कडकनाथ संघर्ष समिती