दिघंचीजवळ कर्जबाजारी माय-लेकाचे विष प्राशन
By Admin | Updated: October 3, 2015 23:50 IST2015-10-03T23:50:25+5:302015-10-03T23:50:25+5:30
आईचा मृत्यू : दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर

दिघंचीजवळ कर्जबाजारी माय-लेकाचे विष प्राशन
दिघंची : सततच्या दुष्काळामुळे कर्जबाजारी झाल्याने आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (दिघंची) येथील शेतकरी माय-लेकाने कीटकनाशक प्राशन केले. यामध्ये कल्पना उत्तम पुजारी (वय ५०) यांना जीव गमवावा लागला, तर त्यांचा मुलगा देवीदास उत्तम पुजारी (२६) याचे प्राण वाचले. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
दिघंचीपासून पाच किलोमीटरवर पुजारवाडी आहे. तेथे पुजारी कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. उत्तम पुजारी यांची दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी कल्पना, मुलगा देवीदास, सून यांच्यासह ते मजुरी व शेती करतात. मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परिणामी पुजारी कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यावर्षी तर पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली आहे. शेतीमधून काहीच उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र आहे.
पुजारी कुटुंबाने सोसायटीकडून कर्ज घेतले आहे. शिवाय गावातील काहीजणांकडून हातउसने पैसे घेतले आहेत. मात्र दुष्काळामुळे कर्ज फेडता आलेले नाही. कर्जाचा बोजा वाढत असल्याने वसुलीचा तगादा सुरू होता. त्यामुळे कल्पना व देवीदास हे मायलेक अस्वस्थ होते. शनिवारी सकाळी उत्तम पुजारी रानात गेले होते, तर देवीदासची पत्नी बाहेर गेली होती. त्यावेळी तणावात असलेल्या कल्पना व देवीदास या मायलेकांनी घरात निआॅन हे कीटकनाशक प्राशन केले. ही बातमी समजताच उत्तम पुजारी, सरपंच आबासाहेब पुजारी, माजी सरपंच बाळासाहेब मोरे व ग्रामस्थांनी दोघांना आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच कल्पना पुजारी यांचा मृत्यू झाला. देवीदास याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने आटपाडी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)