तहसीलदारांच्या नोटिशीने मिरजेत वाद
By Admin | Updated: May 16, 2016 00:46 IST2016-05-16T00:46:05+5:302016-05-16T00:46:05+5:30
चार कोटींचा दंड : ओढापात्रातून गाळ काढण्याचे प्रकरण आणखी तापले

तहसीलदारांच्या नोटिशीने मिरजेत वाद
मिरज : मिरजेत जलशिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून गेले दोन महिने ओढापात्रातील गाळ काढण्याचे काम करणाऱ्यांना तहसीलदारांनी चार कोटी रुपये दंडाची नोटीस बजाविल्याने याबाबत वाद निर्माण झाला आहे. शहरालगत पंढरपूर रस्ता ते मालगाव रस्त्यापर्यंत ओढापात्रातील झाडे-झुडपे, गाळ काढून स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र ओढ्यातील मुरूम व माती वापरल्याबद्दल तहसीलदार किशोर घाडगे यांनी बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांना दंडाची नोटीस बजाविली आहे.
मानमोडी, तानंग, सावळी, पंढरपूर रस्ता, मालगाव रस्ता, वखार भाग, रेल्वे ब्रीज, कृष्णा घाट रस्ता, कृष्णा नदीपर्यंत वाहणाऱ्या मिरजेतील ओढ्यात कचरा, सांडपाणी व काही उद्योगांचे दूषित पाणी सोडल्याने दुर्गंधी वाढून, ओढापात्रात गाळ साचून पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. मिरज डेव्हलपमेंट फोरमनेओढ्याच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाहता राहण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला. तहसीलदारांच्या रितसर परवानगीनंतर जलशिवार योजनेअंतर्गत फेब्रुवारीत ओढ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर जेसीबी, डिझेल व खर्चाची रक्कम गोळा करून स्वयंसेवी संस्थेद्वारे महापालिका व प्रशासनाच्या देखरेखीखाली गाळ काढण्यात आला आहे. ओढा पुनरुज्जीवनासाठी बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन, राजा देसाई, मुनीर मुल्ला, मकरंद देशपांडे यांच्यासह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. दोन महिन्यात ओढापात्रातील झाडे-झुडपे व शेकडो ट्रक गाळ काढण्यात आल्याने ओढ्याचे पात्र मोकळे झाले आहे.
जलशिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्यात आल्यानंतर तहसीलदार किशोर घाडगे यांनी, ओढापात्रातील सुमारे ८५ लाख रुपये किमतीची माती व मुरूमाचा खासगी जागेत भर टाकण्यासाठी वापर करण्यात आल्याने, चार कोटी रूपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजाविली आहे. तहसीलदारांच्या दंडात्मक कारवाईचा वाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचल्यानंतर पालकमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गाळ : खासगी जागेत
जलशिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्यात आल्यानंतर तहसीलदार किशोर घाडगे यांनी, ओढापात्रातील सुमारे ८५ लाख रुपये किमतीची माती व मुरूमाचा खासगी जागेत भर टाकण्यासाठी वापर करण्यात आल्याने, चार कोटी रूपये दंडात्मक कारवाईची नोटीस बजाविली आहे.