आमदार निधी बांधकामला दिल्यावरून सभेत वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:06+5:302021-05-22T04:25:06+5:30
शिराळा : आमदारांनी दिलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का वर्ग केला आहे? अशी विचारणा करून खासदारांनी दिलेला निधी नगरपंचायत ...

आमदार निधी बांधकामला दिल्यावरून सभेत वादावादी
शिराळा : आमदारांनी दिलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का वर्ग केला आहे? अशी विचारणा करून खासदारांनी दिलेला निधी नगरपंचायत स्वतः खर्च करू शकते मग आमदारांनी दिलेला निधी का करू शकत नाही. निधीमध्ये तसेच विकासकामांबाबत सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप भाजपच्या सदस्यांनी नगरपंचायत सर्वसाधारण सभेत केला. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण, गॅस शवदाहिनी बसविणे या ठरावांना मंजुरी केला.
शिराळा येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली. नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील, विरोधी पक्षनेते अभिजितसिंह नाईक प्रमुख उपस्थित होती. आमदार निधीबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदारांनी दिलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागच खर्च करेल, असा ठराव केला. या ठरावास भाजपच्या सदस्यांनी तीव्र शब्दांत विरोध केला. खासदार माने यांचा फंड नगरपंचायत खर्च करू शकत असेल तर आमदारांचा फंड खर्च करण्यास नगरपंचायतीला काय अडचण आहे. हा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे नक्की कारण काय, असा सवाल भाजप सदस्यांनी उपस्थित केला तरीही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर आमदार फंड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले.
यावर नगराध्यक्षा कदम यांनी नियमांनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमदार फंड देण्याचा निर्णय झाला आहे. मंजूर विकासकामात आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
पाणीपुरवठा सभापती मोहन जीरंगे यांनी शहरातील यापूर्वी झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. एका वर्षात कामे खराब होऊन गेली असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने ती दुरुस्त करून देण्याची मागणी केली.
यावेळी सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे, बांधकाम सभापती प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, मोहन जिरंगे, आशाताई कांबळे, संजय हिरवडेकर, विश्वाप्रताप नाईक, केदार नलवडे, उत्तम डांगे, नेहा सूर्यवंशी, सीमा कदम, राजश्री यादव, वैभव गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक कविता गायकवाड, शरद पाटील, सुभाष इंगवले, प्रीती पाटील, काजोल शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.