तरुणास फाशीची शिक्षा

By Admin | Updated: April 19, 2015 00:51 IST2015-04-19T00:51:14+5:302015-04-19T00:51:14+5:30

न्यायालयाचा निकाल : आटुगडेवाडीत चिमुरडीचा बलात्कार करून केला होता खून

Death sentence for the young man | तरुणास फाशीची शिक्षा

तरुणास फाशीची शिक्षा

इस्लामपूर : आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथील नात्याने भाची लागणाऱ्या सातवर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विठ्ठल तुकाराम आटुगडे (वय २३, रा. आटुगडेवाडी) याला शनिवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. ना. सरदेसाई यांनी खुनासाठी मरेपर्यंत फाशीची, तर बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा देण्याचा न्या. सरदेसाई यांचा हा दुसरा निर्णय ठरला. फिर्यादीतर्फे सहायक सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
विठ्ठल आटुगडे याला न्यायालयाने विविध कलमासाठी स्वतंत्र शिक्षा सुनावल्या. या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असून, कारागृहातील कालावधी शिक्षेतून वगळण्याची सूट देण्यात आली.
दि. १० फेबु्रवारी २०१५ रोजी या खटल्याची सुनावणी ‘इन कॅमेरा’ सुरू झाली. त्यानंतर शनिवारी ६७व्या दिवशी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याचा निकाल दिला. दोन्ही वकिलांचा फक्त युक्तिवाद खुल्या स्वरूपात झाला. उर्वरित सर्व कामकाज ‘इन कॅमेरा’ चालले. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील पीडित मुलीची आई, चुलते, आत्या, सौ. मंगल लाड, संपत कडवेकर, संजय माने, दत्तात्रय शिराळकर, सुभाष कारंडे, आरोपी शिकत होता त्या शाळेचे प्राचार्य महादेव पाटील, मित्र प्रथमेश जाधव, तहसीलदार विजया यादव, डॉ. सुनील कांबळे, डॉ. नामदेव पाटील, कोकरूडचे पोलीस निरीक्षक बी. डी. वाघमारे, कासेगावचे पोलीस निरीक्षक बी. डी. वाघमारे, कासेगावचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी : फिर्यादी महिला सातवर्षीय मुलीसोबत नोव्हेंबर २०१३ मध्ये भाऊबिजेसाठी माहेरी आटुगडेवाडी येथे आल्या होत्या. त्यावेळी विठ्ठल आटुगडेने ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलीस केस कापण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. सायकलवरून सय्यदवाडीस जाताना त्याने येणपे हद्दीतील डोंगरमाथ्यावर निर्मनुष्य ठिकाणी गवताच्या रानात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी हा प्रकार घरी सांगेल या भीतीने काही वेळानंतर तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह तेथेच लपवला. अंधार पडल्यानंतर मृतदेह फरफटत आणून खाली रस्त्याकडेच्या झुडपात पुरला. ७ नोव्हेंबरला सकाळी त्याला येळगाव फाटा (ता. कऱ्हाड) येथे ताब्यात घेतल्यावर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
सुनावणीवेळी सरकारी वकील देशमुख यांनी युक्तिवादात सांगितले की, निरागस व असहाय्य मुलीवर अमानुषपणे अत्याचार करताना आरोपीने दाखवलेली क्रौर्याची परिसीमा घृणास्पद आणि समाजविघातक आहे. त्यामुळे आटुगडेला फाशीची शिक्षा द्यावी. बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयातील निवाडे दाखल करून कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. न्या. सरदेसाई यांनी या खटल्याचा निकाल देताना ही अमानुष घटना दुर्मीळातील दुर्मीळ असल्याचे नमूद केले. आरोपीचे कृत्य घृणास्पद असून, सामाजिक संकेतांना बाधा आणणारे आहे. अशा आरोपीला समाजात ठेवणे धोकादायक ठरेल. अशा अमानवी आणि अमानुष कृत्यांना पायबंद घालून कायद्याचा वचक कायम राहण्यासाठी त्याला मोठी शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे, असा निष्कर्ष नोंदवून विठ्ठल आटुगडेला मरेपर्यंत फाशी देण्याचा निकाल जाहीर केला.
शिक्षेचा तपशील असा : कलम ३०२, खुनासाठी - मरेपर्यंत फाशी व २ हजार रुपये दंड. कलम ३७६ (क) बलात्कार - जन्मठेप व २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधी कैद. कलम ३६३ - अपहरण - ३ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद. कलम ३६६- अपहरण व ताबा - २ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद. कलम २०१- पुरावा नष्ट करणे - ३ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ साठी ७ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद. कलम ६ साठी १० वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद.
क्रौर्याची परिसीमा
विठ्ठल आटुगडेने मुलीवर डोंगरावर बलात्कार केल्यानंतर तिचा खून केला. तेथून पाचशे फूट खाली मृतदेह फरफटत आणला. तिचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या क्रौर्याची परिसीमा मानवी जीवनाला काळिमा फासणारी ठरली.
फाशीच हवी
मृत मुलीच्या आईने न्यायालयात झालेल्या ‘इन कॅमेरा’ सुनावणीवेळी रडत-रडतच साक्ष दिली होती. मुलीचा घात करणाऱ्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे, अशी तिची मानसिकता होती. शुक्रवारी आरोपीला दोषी धरण्यात आले, त्यावेळी मुलीची आई न्यायालयात उपस्थित होती. त्यावेळी सरकारी वकिलांकडे मुलीच्या आईने ही भावना बोलून दाखवली.
निकाल समाधानकारक
सहायक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख म्हणाले, न्यायालयाचा निकाल समाधानकारक आहे. नातेसंबंधातील विश्वास आणि एकूणच समाजमनावर परिणाम करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षाच योग्य आहे.
न्यायालयाची दुसरी फाशी
इस्लामपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावणारा हा दुसरा निर्णय ठरला. या दोन्ही फाशीच्या शिक्षा न्या. सरदेसाई यांनीच दिल्या. सव्वासात वर्षांच्या मावस भाचीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या सदाशिव जेटाप्पा कांबळे याला २६ मार्च २०१३ ला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शनिवारी आटुगडेवाडीच्या विठ्ठललाही फाशी सुनावली. सरकारी वकील अरविंद देशमुख यांची ही फाशीची शिक्षा देण्याची पहिलीच वेळ. त्यांनी आतापर्यंत ४७ खटल्यांत आरोपींविरुद्ध शिक्षेचे निकाल मिळविले आहेत. त्यात २७ जन्मठेपेच्या शिक्षा आहेत.




 

Web Title: Death sentence for the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.