जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर फक्त १.४८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:27+5:302021-04-18T04:25:27+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी मृत्युदर मात्र अवघा १.४८ टक्के आहे. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून ...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर फक्त १.४८ टक्के
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी मृत्युदर मात्र अवघा १.४८ टक्के आहे. कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढण्यात आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असल्याचे दिलासादायी चित्र आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असला तरी बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. ११ ते १६ एप्रिल या सहा दिवसांत ४२३६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्याचवेळी १७१५ रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. म्हणजे बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची टक्केवारी सुमारे ४९ टक्के आहे. या कालावधीत दररोज कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील वीसपेक्षा कमी आहे. या कालावधीत ६३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील बहुतांश रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण फक्त १.४८ टक्केच आहे.
१ जानेवारीपासून आजअखेर मृत्यूचे प्रमाण १.४८ टक्के आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर मात्र फारच कमी असल्याची दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. व्हेंटिलेटर बेड, प्राणवायू आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स या सर्वांची टंचाई असतानाही रुग्णांना मृत्यूपासून रोखण्यात डॉक्टर यशस्वी ठरत आहेत. चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढविले आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेनच्या दररोज सरासरी तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत, त्यामध्ये एका दिवसाची सर्वाधिक रुग्णसंख्या ९२१ इतकी आहे.
चौकट
११ ते १६ एप्रिलदरम्यान बाधित, बरे झालेले व मृत असे
११ एप्रिल ४८७ २४१ ५
१२ एप्रिल ५२६ २७७ ६
१३ एप्रिल ६५७ २६७ १०
१४ एप्रिल ७६२ ३१४ १०
१५ एप्रिल ९२१ २४५ १७
१६ एप्रिल ८८३ ३७१ १५
कोट
पहिल्या लाटेपासूनचा जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा मृत्युदर ३.२८ टक्के आहे. गेल्या १ जानेवारीपासून तो कमी झाला असून, १.४१ टक्क्यांवर आहे. टक्केवारी निश्चित करण्याची सध्याची पद्धत एकूण बाधित आणि त्यातील मृत्यू या पद्धतीची असल्याने प्रमाण जास्त दिसते. गंभीर व्याधीग्रस्तांचा विचार केल्यास मृत्यूची टक्केवारी आणखी कमी होईल.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक