विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2014 00:43 IST2014-06-08T00:40:22+5:302014-06-08T00:43:29+5:30
तडसरमधील घटना : वीज कंपनीवर संताप

विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू
कडेगाव : तडसर (ता. कडेगाव) येथे विहिरीवरील विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का बसून अनिल संपतराव पवार (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी दीड वाजता घडली.
तडसर येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल पवार हे पत्नी, दोन मुली आणि एक मुलासह रहात होते. स्वत:ची अत्यल्प शेती सांभाळत प्रसंगी शेतमजुरी करीत होते. आज शनिवारी दुपारी दीड वाजता ते स्वत:च्या विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. दरम्यान, विद्युत पंप सुरू करताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद चिंचणी-वांगी पोलिसात भाऊसाहेब शामराव पवार यांनी दिली आहे. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला. अधिक तपास पोलीस हवालदार एस. एन. पाटील करीत आहेत. सलग तिसरा बळी
कडेगाव तालुक्यात शुक्रवारी मोहित्यांचे वडगाव येथील जयराज शिंदे यांचा वादळी वाऱ्याने तुटलेल्या विजेच्या तारामधून विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी वांगी येथील रघुनाथ गणपती एडके यांचा विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला, तर आज तडसर येथील अनिल पवार यांचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अजून किती बळी जाणार, असा सवाल व्यक्त होत आहे. (वार्ताहर)