हिंगणगावच्या जवानाचा मृत्यू

By Admin | Updated: November 26, 2015 00:27 IST2015-11-26T00:27:11+5:302015-11-26T00:27:11+5:30

पश्चिम बंगालमधील घटना : गोळ्या लागून मृत्यू झाल्याची माहिती

Death of Hingangaon Jawan | हिंगणगावच्या जवानाचा मृत्यू

हिंगणगावच्या जवानाचा मृत्यू

कडेगाव : भारतीय सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कार्यरत असलेले आदित्य चंद्रकांत कदम (वय २४, रा. हिंगणगाव बु., ता. कडेगाव) यांचा पश्चिम बंगाल येथे बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही.
दरम्यान, मंगळवारी रात्री ११ वाजता आदित्य यांचा बंदुकीच्या गोळ्या लागून मृत्यू झाला, असे सीमा सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी आदित्य यांचे भाऊ अमोल यांना कळविले. परंतु घटनास्थळावरील सविस्तर माहिती समजली नाही. आदित्य यांचा पश्चिम बंगालमध्ये मृत्यू झाल्याची माहिती हिंगणगाव बुद्रुक या त्यांच्या मूळ गावातील ग्रामस्थांना बुधवारी सकाळी समजली आणि हिंगणगाव व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली.
आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी अशा कुटुंबासह आदित्य हे बालपणापासून घाटकोपर (मुंबई) येथे राहत होते. आदित्य यांच्या वडिलांचे घाटकोपरमध्ये किराणा मालाचे दुकान आहे. वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. भाऊ अमोल हे खासगी कंपनीत नोकरी करतात. आदित्य हे गेल्या चार वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते.
दरम्यान, आदित्य यांचे पार्थिव शुक्रवार, दि. २७ रोजी हिंगणगाव बुद्रुक येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. हिंगणगाव येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंगणगाव येथील त्यांच्या नातेवाईकांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Death of Hingangaon Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.