सहायक फौजदाराचा बंदोबस्तावेळी मृत्यू
By Admin | Updated: May 4, 2015 00:35 IST2015-05-04T00:29:09+5:302015-05-04T00:35:25+5:30
हृदयविकाराचा झटका

सहायक फौजदाराचा बंदोबस्तावेळी मृत्यू
मिरज : मिरजेत युनियन बँकेतील चेस्टच्या बंदोबस्तासाठी असलेल्या प्रदीप के. पाटील (वय ५४, रा. कसबे डिग्रज) या मुख्यालयातील सहायक फौजदाराचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मिरजेत किल्ला परिसरातील युनियन बँकेतील चेस्टमध्ये बँकांची रोकड ठेवण्यात येत असल्याने येथे नेहमी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. शनिवारी रात्री प्रदीप पाटील व तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते. आज सकाळी सात वाजता प्रदीप पाटील बँकेच्या प्रवेशव्दारात बेशुध्दावस्थेत पडलेले दिसल्यानंतर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी प्रदीप पाटील यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बंदोबस्तावरील सहायक पोलीस फौजदाराचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे प्रदीप पाटील यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कसबे डिग्रज येथील प्रदीप पाटील विश्रामबाग येथील पोलीस कर्मचारी वसाहतीत रहात होते. पाटील यांच्यासोबत रात्रपाळीच्या बंदोबस्ताला असलेले अन्य तीन पोलीस कर्मचारी बँकेच्या इमारतीत आतील बाजूस असल्याने पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना समजले नाही. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने पाटील यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. (वार्ताहर)