महापुरानंतर मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:46 IST2019-08-28T23:45:58+5:302019-08-28T23:46:02+5:30
सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या ...

महापुरानंतर मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत
सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या शेतीमालाच्या सौद्यासह इतर व्यवहार सुरू झाले आहेत. मार्केट यार्ड वगळता शहरातील इतर बाजारपेठ मात्र अद्यापही पुराच्या सावटाखालीच असल्याचे चित्र आहे.
सलग सहा दिवस पुराच्या पाण्याखाली शहरातील ७० टक्क्यांहून अधिक भाग होता. त्यामुळे बाजारपेठेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्केट यार्ड व गणपतीपेठ परिसरात सर्वाधिक व्यवहार होतात. यातील मार्केट यार्डाला पुराचा फटका बसला नसला तरी, तेथील व्यवहारावर परिणाम झाला होता. मालाच्या आवक-जावक उलाढालीवरही परिणाम झाल्याने मार्केट यार्डात दररोज अडीच कोटींचे नुकसान झाले होते.
या कालावधित बेदाणा, हळद, गुळासह इतर शेतीमालाचे सौदेही बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले होते. मार्केट यार्डाबरोबरच कोल्हापूर रोडवर असलेला विष्णुअण्णा फळ मार्केट परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील व्यवहार थांबले होते. या कालावधित कांदा, बटाट्याचे सौदे मार्केट यार्डात होत होते. तरीही फळ मार्केटमधील बहुतांश सौद्यावर अद्यापही परिणाम जाणवत आहे. मार्केट यार्डात अपवाद वगळता वर्षभर हळद, बेदाण्याचे सौदे सुरू असतात. पुराच्या कालावधित आठवडाभर हे सौदे बंद होते. सांगली शहराला जोडणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने बाहेरच्या व्यापाºयांना सांगलीत येणे शक्य नव्हते व खरेदी केलेला मालही नेता येणे शक्य नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली होती. सध्या बाजारपेठेतील आवक मर्यादित असून त्यास मागणीही त्याच प्रमाणात आहे.