इस्लामपूर-पेठ राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:01+5:302021-03-31T04:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पेठ-सांगली रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र येथील अधिकाऱ्यांना हा रस्ता महामार्गाच्या दर्जाचा ...

Deadly potholes on Islampur-Peth National Highway | इस्लामपूर-पेठ राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

इस्लामपूर-पेठ राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पेठ-सांगली रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र येथील अधिकाऱ्यांना हा रस्ता महामार्गाच्या दर्जाचा असावा, याचा विसर पडल्याचे दिसते. या रस्त्यावर असलेले खड्डे वाहनधारकांसाठी आणि विशेषत: दुचाकीधारकांसाठी जीवघेणे ठरणारे आहेत. महामार्ग रस्ते विकास विभागाचे याकडे लक्ष जात नाही.

इस्लामपूरपासून अवघ्या चार किलोमीटरवर पुणे-बेंगलोर महामार्ग आहे. पेठनाक्यापासून सांगलीपर्यंतचा मार्ग पूर्वी राज्य महामार्ग होता. तो रत्नागिरी-सोलापूर या मार्गावर असून पेठनाक्याहून इस्लामपूरमार्गे सांगलीकडे जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. कागदोपत्री दर्जा बदलला तरी, वास्तवात मात्र या रस्त्याला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटलेले नाही.

पेठनाक्यापासून कापूरवाडीपर्यंत आणि इस्लामपूरच्या बाजूने बसस्थानकापासून डांगे पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता झाला आहे. दोन्ही बाजूचे हे अंतर सोडून उरलेला रस्ता ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. याच रस्त्यावर तळीतल्या दत्त मंदिरापासून पेठेकडे जाताना दोन्ही बाजूला जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कित्येक अपघात घडत असतात.

दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या महामार्गावरील खड्डे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. किंबहुना खड्डे आले की या अधिकाऱ्यांचे डोळे मिटतात का, असाही प्रश्न पडतो. या खड्ड्यांची डागडुजी होत नसल्याचे स्पष्ट होते. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी, रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: Deadly potholes on Islampur-Peth National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.