पाण्याच्या पाईपमध्ये आढळली मृत घोरपड
By Admin | Updated: December 1, 2014 00:12 IST2014-11-30T22:08:00+5:302014-12-01T00:12:20+5:30
जतला प्रकार : वसंतनगर परिसरात पुरवठा बंद

पाण्याच्या पाईपमध्ये आढळली मृत घोरपड
जत : जत नगरपालिकेच्यावतीने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमधून दोन दिवसांपूर्वी मृत झालेली घोरपड वाहत आल्याने शहरातील प्रभाग क्रमांक १ व वसंतनगर देवकर गल्ली येथील पाणी पुरवठा बंद झाला होता. नगरसेवक परशुराम मोरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाईप फोडून मृत घोरपडे बाहेर काढली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांत खळबळ माजली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जत शहराचे उपनगर असलेल्या विठ्ठलनगर व वसंतनगर येथील नागरिकांना वळसंग रोड येथील केंचराया मंदिराजवळ असलेल्या पाच लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या टाकीतून दोन किवा तीन दिवसांतून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. वसंतनगर येथील देवकर बोळात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला होता. आज (रविवार) सकाळी येथील पाईपलाईन खोदून पाहिली असता, त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मृत झालेली घोरपड अडकून बसल्याचे व त्यामुळे पाणी पुरवठा बंद होता, असे नगरसेवक परशुराम मोरे व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
केंचराया येथील पाण्याच्या टाकीवर झाकण बसविण्यात आलेले नाही. याशिवाय टाकीच्या सभोवताली संरक्षक भिंत अथवा कुंपण घातलेले नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे मद्यपी लोकांचा सतत वावर असतो. यापूर्वी पाईपलाईनमधून भाजीव विटा, मोठे चेंडू, दारुच्या बाटल्या, जळालेली सिगारेट, निरोधची पाकिटे येऊन पाईपलाईन बंद झाली होती. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
परंतु त्याची दखल घेतली जात नाही. जोपर्यंत येथील अपूर्ण काम पूर्ण केले जात नाही, तोपर्यंत येथे सुरक्षा रक्षक नियुक्त करावा आणि नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका टाळावा, अशी मागणी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केली आहे. (वार्ताहर)
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या
यासंदर्भात जत नगरपालिका नगराध्यक्ष रवींद्र साळे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेत कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा रक्षक नियुक्त केला नाही. परंतु टाकीचे अपूर्ण काम पूर्ण करून सभोवताली संरक्षक भिंत त्वरित बांधली जाईल, असे त्यांनी सांगितले.