बोरगावच्या कृष्णाकाठावर मृत माशांमुळे दुर्गंधी
By Admin | Updated: May 19, 2015 00:24 IST2015-05-18T23:18:57+5:302015-05-19T00:24:51+5:30
पाणी सोडले, तेही अपुरेच : पाटबंधारे विभागाचा बेजबाबदारपणा; ग्रामस्थांमधून संताप

बोरगावच्या कृष्णाकाठावर मृत माशांमुळे दुर्गंधी
बोरगाव : कृष्णा नदीपात्रात कारखान्याचे रासायनिक पदार्थ व मळीमिश्रित पाणी मिसळत असल्याने बोरगाव (ता. वाळवा) येथे दोन दिवसात लाखो मासे मृत झाले. हे मासे कुजू लागल्याने बोरगावसह फार्णेवाडी, ताकारी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी परिसरात कृष्णाकाठी दुर्गंधी पसरली आहे. पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडले असले तरी, ते अपुरे असल्याने तुटपुंज्या प्रमाणात मासे वाहून गेले आहेत. किमान दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवसापासून बोरगाव, बहे, ताकारी येथे कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. हे मासे दोन दिवस पाण्यावर तरंगत असल्याने आता कुजू लागले आहेत. मासे कुजल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरु लागली आहे. पाण्याबरोबरच हवेचेही प्रदूषण होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू केल्या असून, पाण्यापासून कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य विभागातर्फे उपाय सुचविले जात आहेत. पाटबंधारे खात्याने अर्धा टीएमसी पाणी सोडले आहे. परंतु एवढ्या पाण्याने मासे वाहून जाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किमान दोन टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.
ज्या कारखान्याने कृष्णा नदीपात्रात रासायनिक पदार्थ व मळीमिश्रित पाणी सोडले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वैभव जलसिंचन योजनेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)
कारवाईची मागणी
सोमवारी दुपारी सरपंच केशव वाटेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. नदी प्रदूषणास जबाबदार कारखाने व उद्योजकांवर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे, बाजीराव मालवेकर यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून कृष्णेचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतानाही कोणावरही कारवाई झालेली नाही. रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करणाऱ्यांना दोन कोटीचा दंड होतो, तशी घटनेत तरतूद आहे, तर मग पाणी प्रदूषण करुन जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कोणतीच कारवाई का होत नाही? प्रशासन गप्प का?
- जितेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, बोरगाव
कृष्णा नदीपात्रात जर कृष्णा साखर कारखान्याने रासायनिक पदार्थ अथवा मळीमिश्रित पाणी सोडले असते, तर शिरटे, नरसिंहपूर, कोळे, बहे येथील नदीपात्रातही मासे मृत झाले असते. केवळ बोरगाव, ताकारी व इतर वाड्या-वस्त्यांवरच मासे मृत झाले. निवडणूक तोंडावर असल्यानेच विरोधक राजकीय हेतूने आरोप करत आहेत.
- अविनाश मोहिते, अध्यक्ष, कृष्णा साखर कारखाना