शिगाव येथे वारणेत मृत मासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:11+5:302021-02-08T04:23:11+5:30
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीमध्ये रविवारी सकाळी मृत माशांचा खच आढळून आला. पाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीने रसायन ...

शिगाव येथे वारणेत मृत मासे
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीमध्ये रविवारी सकाळी मृत माशांचा खच आढळून आला. पाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीने रसायन सोडले असल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वारणा नदी वाहते. आजवरचा इतिहास पाहता नदीमध्ये माशांचे अशा पद्धतीने मृत होण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत. मात्र, रविवारी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिगाव येथे नदीत मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे समजल्यावर ते गोळा करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना रोखले. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे.
नदीतील मृत मासे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे. मासे खाऊ नयेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊनच ते पाणी नागरिकांना पिण्यास देणार आहे. अशी माहिती सरपंच उत्तम गावडे यांनी दिली.
चाैकशीची मागणी
अशा पद्धतीने नदीत माशांचा मृत्यू होत असल्याने याबाबत नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. पाण्याचा रासायनिक घटकांचे मिश्रण झाले असल्यास त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाची संबंधित विभागाकडून योग्य ती चाैकशी केली जावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : शिगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीमध्ये रविवारी मासे मृत झाले होते.