बोरगावातील नदीपात्रात मृत माशांचा खच
By Admin | Updated: May 18, 2015 01:02 IST2015-05-18T01:00:03+5:302015-05-18T01:02:47+5:30
कृष्णा दूषित : बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांमधील नागरी आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

बोरगावातील नदीपात्रात मृत माशांचा खच
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी, मळी मिसळल्याने पाणी दूषित होऊन रविवारी हजारो मासे मृत झाले. बोरगावसह बहे, फार्णेवाडी, ताकारी गावांच्या नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढे होऊनही संबंधितांवर कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने ग्रामस्थांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मासे मृत होण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील मासे मृत झाले आहेत. तसेच अनेक माशांच्या जाती संपुष्टात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे.
नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांवरच कायद्याचा धाक दाखविला जात असल्याने सामान्य नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण न थांबल्यास नदीकाठचे नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. उन्हाळ््यात पाणी कमी होत असताना कृष्णेतील प्रदूषण वाढत आहे. (वार्ताहर)