साखळीचोरांची ‘डीबी’कडून पाठराखण!

By Admin | Updated: March 31, 2015 00:28 IST2015-03-30T23:21:05+5:302015-03-31T00:28:05+5:30

अटक आणि कोठडीही : घडलेल्या गुन्ह्यांचे काय? तपास ठप्पच

DB's arrest from chainchurch! | साखळीचोरांची ‘डीबी’कडून पाठराखण!

साखळीचोरांची ‘डीबी’कडून पाठराखण!

सांगली : विविध गुन्ह्यांचा तपास गुंडाळण्यात शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचा (डीबी) हातखंडाच बनला असल्याचे पाहावयास मिळत आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणाऱ्या साखळीचोरांना पकडले. पण त्याचा तपास पुढे सरकलाच नाही. एकही गुन्हा उघडकीस न आल्याने तपासाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. प्रसारमाध्यमांना याची माहिती मिळू नये, यासाठी पथकाने पुरेपूर दक्षता घेऊन, साखळीचोरांची त्यांनी एकप्रकारे पाठराखणच केली आहे.शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचा तपास गुंडाळला. मुख्य बसस्थानक व आठवडा बाजारात झालेल्या चोऱ्यांची प्रकरणे दाखल न करता परस्पर मिटविली. जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात; मात्र कागदोपत्री कुठेही त्याची नोंद केली नसल्याची शहरात चर्चा सुरु आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी डीबी पथकाच्या या अनागोंदी कारभाराची गंभीर दखल घेऊन चार दिवसांपूर्वी चांगलीच खरडपट्टी केली होती. त्यानंतर बसस्थानकावरील चोरी व पेठभागातील एका घरफोडीचा छडा लावल्याचा आटापिटा करुन पोलीसप्रमुखांची शाबासकी मिळविण्याचा प्रयत्न पथकाने केला. घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल न करता केवळ कच्ची नोंद केली जाते. तपास करुन गुन्हेगारांना पकडले जाते. पण ही कारवाई रेकॉर्डवर न घेण्याचे कारण काय? अशी शहरात उलट-सुलट चर्चा सुरु आहे. गुन्हेगारांना पकडल्याची केवळ कागदोपत्री नोंद केली जात असली तरी, तपासाचे काय? ज्या महिलांचे दागिने गेले आहेत, त्यांना ते परत मिळवून देण्यासाठी ते का प्रयत्न करीत नाहीत. महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याचे गुन्हे शहरात घडले आहेत. हे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना गेल्या आठवड्यात पकडले होते. त्यांना अटक केली, न्यायालयाकडून पोलीस कोठडीही घेतली होती. पण त्यांच्याकडून किती गुन्हे उघडकीस आले, दागिने जप्त केले का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तथापि पथकाने एकमेकांची नावे सांगून माहिती देण्यास नकार दिला. हे गुन्हेगार आज, सोमवारी न्यायालयीन कोठडीत गेले. (प्रतिनिधी)


‘डीबी’कडे चौकशी करा...
गुन्हेगारांची नावे काय आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तथापि ‘आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही डीबी पथकात चौकशी करा’, असे ठाणे अंमलदारांनी सांगितले. डीबी पथक म्हणेल ती पूर्वदिशा, असा सध्या पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे.

Web Title: DB's arrest from chainchurch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.