कारंदवाडीत चार गव्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:46+5:302021-04-02T04:27:46+5:30
आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील कृष्णानगर हाळभागात गुरुवारी चार गवे आढळून आले. गव्याने परिसरात कोणतेही नुकसान केले नसले ...

कारंदवाडीत चार गव्यांचे दर्शन
आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील कृष्णानगर हाळभागात गुरुवारी चार गवे आढळून आले. गव्याने परिसरात कोणतेही नुकसान केले नसले तरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कारंदवाडी येथील कृष्णा नदीकाठावर कृष्णानगर हाळ परिसर आहे. याठिकाणी उसासह बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास या परिसरातील सुनील शिंदे यांना त्यांच्या शेतानजीक चार गवे आढळून आले. शिंदे यांच्यापासून सुमारे अर्धा किलोमीटरवर हे गवे होते. शिंदे एकटे असल्याने त्यांनी पुढे जाण्याचे धाडस केले नाही. काही वेळातच गवे परिसरातील उसाच्या शेताआड झाल्याने पुन्हा दिसले नाहीत.
ही माहिती मिळाल्यावर काही शेतकऱ्यांनी गवे बघण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र दिवसभरात त्यांना गवे दिसून आले नाहीत. भीतीमुळे अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी गव्यांचा शोध घेतला नाही. सायंकाळपर्यंत गव्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
मागील काही दिवसांत मिरजवाडीतील स्मशानभूमी परिसरात गवा दिसला होता. सर्वोदय सहकारी साखर कारखाना परिसरात कबड्डी मळा, आवटी मळा, मिरगुंड परिसर, कारंदवाडी हाळभाग या परिसरातही गव्यांचे दर्शन झाले होते. गुरुवारी पुन्हा गवे दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.