रात्रीच्या अंधारात रुसव्या-फुगव्याचे काजवे

By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T23:05:17+5:302015-05-21T00:01:11+5:30

जिल्हा बँक : मानसिंगराव, विलासरावांच्या ‘एक्झिट’ने संशयकल्लोळ; शिष्टाचाराआड लपली नाराजी

In the darkness of the night, fifty-six fingers of bulge | रात्रीच्या अंधारात रुसव्या-फुगव्याचे काजवे

रात्रीच्या अंधारात रुसव्या-फुगव्याचे काजवे

अविनाश कोळी - सांगली -रात्रीच्या अंधारातच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू झाल्या. रुसव्या-फुगव्याचे काजवे चमकत राहिल्याने तब्बल १२ तास चर्चेचे गुऱ्हाळ चालले. अखेर जयंतरावांचा शब्द प्रमाण मानला जात असल्याने, राजकीय शिष्टाचार दाखवत नाराजांनी इच्छेवर दगड ठेवला. निवडीच्या प्रक्रियेनंतर विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक यांनी बँकेतून क्षणात घेतलेली ‘एक्झिट’ संशयकल्लोळ निर्माण करून गेली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकारी निवडीचे अधिकार आ. जयंत पाटील यांना देण्यात आले होते. जयंतरावांचा शब्द अंतिम मानायचा, असे ठरलेही होते. मात्र तरीसुद्धा शिष्टाचारावर पदांच्या इच्छेचा भार अधिक पडत होता. अनेक शंका-कुशंका मनात घेऊनच रात्रीच्या अंधारात बैठकीला सुरुवात झाली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होती. रात्री साडेनऊ वाजता बैठकीला सुरुवात झाली. इच्छुक असलेल्या सर्वच संचालकांच्या मुलाखती जयंतरावांनी घेतल्या. इच्छुकांच्या शर्यतीत दिलीपतात्या पाटील, मानसिंगराव नाईक, विलासराव शिंदे, शिकंदर जमादार ही चार नावे सर्वाधिक चर्चेत होती. विलासराव शिंदे आणि शिकंदर जमादार यांच्या नावासमोर रात्रीच फुली पडली होती. केवळ दिलीपतात्या आणि मानसिंगराव या दोन नावांभोवतीच रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू राहिली. दोघांपैकी एकाला संधी मिळणार, याची खात्री संचालकांना होती. मात्र कोणाला संधी द्यायची, याचा फैसला नेत्यांकडून लवकर झाला नाही. अंधारातल्या चर्चेनं सूर्य पाहिला तरी चर्चेचे अस्तित्व जिवंतच होते. पॅनेलच्या प्रमुख नेत्यांचीही संभ्रमावस्था वाढली. तोपर्यंत जयंतराव इस्लामपुरात पोहोचले होते.
जयंतरावांनी सकाळी लवकर खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांना इस्लामपुरात बोलावून घेतले. तेथे दिलीपतात्या आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, या सर्व नेत्यांनी सांगलीत येऊन जिल्हाध्यक्ष व इच्छुक असलेले विलासराव शिंदे यांना त्याची माहिती दिली. शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली. ही सर्व प्रक्रिया घडताना रात्रभर राजकारण रंगले होते.
अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीवेळी सर्वच संचालक उपस्थित होते. मात्र निवडी झाल्यानंतर सर्वात अगोदर विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक बँकेतून बाहेर पडले. शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते लगेच गेल्याचे स्पष्टीकरण पॅनेलच्या नेत्यांनी दिले. तरीही या दोन्ही इच्छुकांच्या कृतीतून संशयकल्लोळ निर्माण झाला. दुसरीकडे इच्छुकांनीही सर्वानुमते निर्णय झाल्याचे सांगितले. पक्षांतर्गत सर्व काही आलबेल असल्याचे सांगत त्यांनी नाराजी शिष्टाचाराआड लपविल्याची चर्चा होती.


काँग्रेसची माघार कशासाठी?
काँग्रेसने सभा सुरू होताच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यांनी लगेचच माघार घेतली. याविषयी मोहनराव कदम, विशाल पाटील म्हणाले की, वादग्रस्त लोकांना संधी न देता सत्ताधारी पॅनेलने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने आम्ही माघार घेतली आहे. पाच वर्षे विरोधातच राहणार असून कोणतेही पद मिळाले तरी सत्तेत जाणार नाही. काँग्रेसच्या संचालकांनी सत्ताधारी गटाकडे उपाध्यक्षपद मागितल्याची चर्चा बँकेत रंगली होती. मात्र काँग्रेस व सत्ताधारी संचालकांनी या गोष्टीचा इन्कार केला.


संशयकल्लोळाची कारणे१रात्रभर चर्चेचे गुऱ्हाळ चालण्याचे दुसरे कोणते कारणही नव्हते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत कोणताही वाद नव्हता, तर तासाभरात नावे निश्चित का झाली नाहीत?, असा सवाल उपस्थित होत आहे.


२हा एक स्ट्रॅटेजीचा (धोरण) भाग होता, असे मत संजयकाका, जगताप यांनी व्यक्त केले. वास्तविक अशी स्ट्रॅटेजी अल्पमताच्या शक्यतेवेळी स्वीकारली जाते. बँकेत ७२ टक्के संख्याबळ असतानाही नावांच्या गोपनीयतेचे धोरण स्वीकारण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित झाला.



३बँकेच्या निवडी झाल्यानंतर अन्य संचालक बराच वेळ त्याठिकाणी होते, मात्र मानसिंगराव नाईक, विलासराव शिंदे लगेच निघून गेले.

.
अशा होत्या चर्चा
मानसिंगराव नाईक इतके आग्रही झाले की, त्यांनी संचालक पदही नको, अशी भूमिका घेतली होती.
दिलीपतात्या पाटील यांचाही आग्रह वाढल्यामुळे नेत्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला होता.
मानसिंगरावांचे नाव रात्रीपर्यंत अध्यक्षपदासाठी पुढे होते.
निवडीनंतर इच्छुक असलेल्या नेत्यांना नाराजी लपविता आली नाही.
जुन्याच अनुभवी लोकांना संधी देणार असाल, तर नव्या लोकांनी काय करायचे?, असा सवालही बैठकीत काही इच्छुकांनी उपस्थित केला.

सत्ताधारी म्हणतात...
खासदार संजयकाका, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांनी सत्ताधारी गटात कोणताही रुसवा-फुगवा झाला नसल्याचे स्पष्ट केले. पदासाठी कुणी हट्ट धरण्याचाही प्रकार घडलेला नाही. अशाप्रकारच्या चर्चा होत असतील, तर त्या चुकीच्या आहेत.



मानसिंगराव म्हणतात...
चार इच्छुकांची नावे आघाडीवर होती, पण संधी एकालाच मिळणार होती. भविष्यात कोणाला, कोणती संधी मिळणार, हा आताच्या चर्चेचा विषय नव्हता. निवडीविषयी कोणाचेही दुमत नाही.



नविलासराव म्हणतात...
पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वांच्या चर्चेतून झाल्या. पदांचा कालावधी व अन्य कोणत्याही गोष्टीचे धोरण अद्याप ठरलेले नाही. पदांच्या निवडीविषयी कोणताही वाद नाही.

Web Title: In the darkness of the night, fifty-six fingers of bulge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.