अंगणवाडीतील बालचमूंचा खाऊ धोक्यात

By Admin | Updated: November 30, 2015 01:12 IST2015-11-30T00:16:24+5:302015-11-30T01:12:16+5:30

मिरज तालुक्यातील परिस्थिती : शासनाकडून बचत गटाची बिले थकित

The dangers of eating chickpeas in the anganwadi | अंगणवाडीतील बालचमूंचा खाऊ धोक्यात

अंगणवाडीतील बालचमूंचा खाऊ धोक्यात


नरवाड : मिरज तालुक्यातील महिला बचत गटांचे अंगणवाडीला खाऊ पुरविण्याचे पैसे शासनाने अद्यापही दिले नसल्याने बालचमूंचा खाऊ धोक्यात आला आहे.
यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या काळात अंगणवाडीच्या मुलांना खाऊ शिजवून देण्यासाठी अन्नपदार्थांचे साहित्य शासनाकडून पुरविले जात होते. याकामी मदतनीसांना अधिक परिश्रम घ्यावे लागत होते. हा खाऊ अंगणवाडीतच शिजविला जायचा. अंगणवाडीत खाऊ शिजविताना काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या. याचा लेखाजोखा घेऊन तत्कालीन सरकारने अंगणवाडीच्या मुलांना खाऊ शिजवून देण्यासाठी महिला बचत गटांना अनुमती दिली.
तेव्हापासून महिला बालकल्याण विभागाच्या देखरेखीखाली अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार किती, कोणता, कधी, द्यावा याची रुपरेषा ठरवून देण्यात आली. त्यानुसार महिला बचत गट स्वत: खासगी दुकानातून माल खरेदी करून अंगणवाडीतील मुलांना खाऊ स्वतंत्रपणे शिजवून देत आहेत.
मात्र एप्रिल २०१५ पासून महिला बचत गटांची बिले पूर्णपणे थकित आहेत. बिले थकित असूनही गेल्या ७ महिन्यांपासून महिला बचत गटांनी पदरमोड करून अंगणवाडीतील बालचमूंना खाऊ देण्याचे काम अखंडित सुरू ठेवले आहे, याची जाणीव शासनाला असूनही अद्याप महिला बचत गटांना खाऊची बिले दिलेली नाहीत.
परिणामी सर्व महिला बचत गट पदरमोड करून घाईला आले असून, कोणत्याहीक्षणी बालचमूंचा खाऊ बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बचत गटातील महिलांनी प्रसंगी व्याजाने पैसै काढून आणि अंगावरील सोने गहाण टाकून सद्यस्थितीत बचत गट चालविले आहेत.
याबाबत म्हैसाळ (ता. मिरज) येथील धनश्री महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुवर्णा डिग्रजे यांनी सांगितले की, शासनाने आता आमचा अंत पाहू नये. त्वरित खाऊची बिले मिळाली नाहीत, तर नाईलाजास्तव अंगणवाड्यांना खाऊ बंद करावा लागेल. खाऊची बिले त्वरित देण्याची मागणी सर्वच महिला बचत गटांकडून होत आहे. (वार्ताहर)


बचत गट अडचणीत
अंगणवाडी बालकांना बचत गटामार्फत पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. या बचत गटांकडून पदरमोड करून सात महिन्यांपासून पोषण आहार पुरवठा सुरू आहे. यामुळे हे बचत गट सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याकडे शासनाने लक्ष द्यावे.

Web Title: The dangers of eating chickpeas in the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.