दंडोबा पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Updated: March 16, 2015 00:03 IST2015-03-15T22:54:00+5:302015-03-16T00:03:53+5:30

कर्मचाऱ्यांची कमतरता : महिन्यात दोनवेळा आग; वनराईचे नुकसान

The danger of the existence of Dandoba tourist site | दंडोबा पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात

दंडोबा पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात

देशिंग : मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या निसर्गरम्य दंडोबा डोंगर पर्यटनस्थळास एकाच महिन्यामध्ये तब्बल दोनवेळा आग लागली असल्याने सुमारे पंधरा ते वीस एकर डोंगरावरील वनस्पती जळून खाक झाल्या. त्यामुळे या पर्यटन स्थळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.हे पर्यटनस्थळ वन विभागाच्या देखरेखीखाली असून, याची सुरक्षा राखण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र तब्बल ११५० हेक्टर लांब डोंगराची पाहणी करण्यासाठी कर्मचारी सध्या कमी असल्याने संपूर्ण परिसराची पाहणी होत नाही. त्यामुळे वारंवार आगीचे प्रकार घडत आहेत. येथील वनराई संपुष्टात येत आहे. या पर्यटन स्थळामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, दुर्मीळ प्राणी, साप, ससे, हरणे, कोल्हे आदी प्राण्यांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच येथे काही लोकांकडून ससे मारण्याचे प्रकारही घडत आहेत. मात्र याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.दि. ८ रोजी लागलेल्या आगीत सुमारे ८ ते ९ एकर डोंगर परिसरातील वनराई जळून खाक झाली, मात्र दोन्ही वेळी लागलेल्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी सांगली, मिरज, कोल्हापूर, कर्नाटकातील निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात येत असल्याने, त्यांच्याकडूनही अशा दुर्घटना घडत असल्याचे बोलले जाते. या स्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यापासून काही प्रमाणात निधी खर्च करुन विकास करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र काही मूलभूत सुविधांचा अभाव, शिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, याप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. या डोंगर परिसरामध्ये जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दंडोबा डोंगर पर्यटन स्थळाकडे वन विभाग व प्रशासनाने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांची तसेच पर्यटनस्थळ म्हणून लागणाऱ्या मूलभूत सुविधांची सोय करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींमधून होत आहे. (वार्ताहर)


मूलभूत सुविधांचा अभाव
दंडोबा डोंगर परिसरास पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यापासून काही प्रमाणात निधी खर्च करुन विकास करण्याचा प्रयत्न झाला आहे; मात्र मूलभूत सुविधांचा अभाव, शिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने, डोंगर परिसरात आगी लावण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत.

Web Title: The danger of the existence of Dandoba tourist site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.