साहित्य संमेलनात घुमणार डोंगरवाडीचे झांजपथक
By Admin | Updated: January 13, 2016 23:33 IST2016-01-13T23:33:36+5:302016-01-13T23:33:36+5:30
सहभागाचे निमंत्रण : दीडशे युवकांच्या पथकाचा दिल्ली, उत्तर प्रदेशातही वाजविला डंका

साहित्य संमेलनात घुमणार डोंगरवाडीचे झांजपथक
ऐतवडे बुद्रुक : डोंगरवाडी (ता. वाळवा) येथील अभिजित पाटील युवा मंचच्या झांजपथकास पुणे (पिंपरी—चिंचवड) येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.
डोंगरवाडी हे वाळवा तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेले छोटेसे गाव. येथील हनुमान मंदिर सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. या गावातील युवकांनी संघटित राहावे, यासाठी माजी सरपंच प्रतिनिधी दिलीप शेखर यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित पाटील यांच्या नावाने युवा मंचची स्थापना १३ मे १९९७ रोजी केली. या पथकात सुमारे १५0 युवकांचा सहभाग आहे.
यापूर्वी या पथकाने गणेशोत्सवात दिल्ली, उत्तर प्रदेश येथील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यामुळे दरवर्षी दूरदूरच्या गणेशोत्सवात सहभागी होण्याचा मान या पथकास मिळत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंत्री (ता. शिराळा) येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात या झांजपथकाने कला सादर केली होती. त्यांच्या कलेने मंत्रमुग्ध झाल्यानेच, पाटील यांनी त्यांना संमेलनाच्या दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते संमेलन स्थळापर्यंत पार पडणाऱ्या ग्रंथदिंडीत वाद्यवृंदासह कला सादर करण्याचा बहुमान दिला आहे. (वार्ताहर)
साहसी खेळांचा समावेश
या झांजपथकात झेंडा सलामी, कवायत, कबड्डी, स्वस्तिक, खो—खो, कुस्ती या प्रकारासह विविध साहसी खेळ सादर केले जातात. माजी आमदार विनय कोरे, अभिजित पाटील यांच्या सहकार्यामुळे व उत्कृष्ट झांजपथकाच्या खेळामुळे आमच्या पथकास साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मानाचा मुजरा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करुन दाखवू, असे पथकप्रमुख दिलीप शेखर, श्रीरंग कोपार्डे, जयवंत माने, अनिल पेठकर यांनी स्पष्ट केले.