दंडोबा, गिरलिंग सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 11, 2014 00:21 IST2014-08-10T20:36:39+5:302014-08-11T00:21:06+5:30
भाविकांत नाराजी : बेळंकीचे शिवमंदिर, लिंगनूरच्या पुरातन देगल मंदिराचीही दुरवस्था

दंडोबा, गिरलिंग सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत
प्रवीण जगताप - लिंगनूर , श्रावणात गर्दी होणारी मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील तीर्थक्षेत्रे व मंदिरे सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. श्रावणात दंडोबा, गिरलिंग, लिंगनूरचे पुरातन देगल मंदिर, बेळंकीचे मंदिर व मठात गर्दी असते. गिरलिंग मंदिर येथे तर यात्राच भरते, तर शेवटच्या श्रावण सोमवारी या सर्वच मंदिरांत भाविकांची गर्दी उसळते. मात्र येथील रस्ते, पाणी, बागबगीचा, पर्यटन विकास याबाबत प्रशासन उदासीन आहे.
मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगरात असणाऱ्या दंडनाथ मंदिर परिसरात सुविधांची वानवा आहे. ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र असूनही येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार आहे. त्याचा दोन कोटींचा निधीही मंजूर आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात सभामंडप, मंदिराच्या डागडुजीचे काम झाले आहे. सध्या येथे बागबगीचा विकसनाचे काम सुरू आहे, तर काही पॉर्इंट्सवर पुलाचे काम सुरू होत आहे. पूल व कठडे बांधून येथे पर्यटन पॉर्इंट विकसित करण्यात येणार आहेत. या सर्व पर्यटन विकासाची गती मात्र अत्यंत धिमी आहे. दंडोबा येथे जाण्यास केवळ खरशिंगमार्गेच चांगला रस्ता उपलब्ध असून, तो दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप कच्चाच आहे.
गिरलिंग डोंगरात श्रावण सोमवारी जणू यात्राच भरते. उंचावर असणारे मंदिर, जवळून अनुभवता येणारे ढग, मंदिराच्या वरील बाजूस असणारे विस्तीर्ण उंचीवरचे पठार पाहता, येथे पर्यटनास आवश्यक पॉर्इंट्स विकसित केले पाहिजेत. येथेही बगीचा निर्माण करून लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य बसवून शालेय सहलींसाठी खास व्यवस्था करणे गरजेचे आहे. या डोंगरानजीक जुना पन्हाळा असे ठिकाण आहे.
लिंगनूर येथील देगल मंदिरात शंकराची पिंड असून, हे पुरातन मंदिर चौदाव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर असल्याचे मानले जाते. येथे ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे पुणे येथील पुरातत्त्व विभागाकडून एकदा छायाचित्रण करण्यात आले होते; मात्र या मंदिराच्या देखभाल, दुरूस्तीसह मंदिर विकासासाठी निधीची उपलब्धता झाली नाही. भाविक मात्र या परिसराची स्वच्छता ठेवून श्रावण महिन्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करतात.
बेळंकी येथील मठातही शिवमंदिर असून, चार वर्षांपूर्वी जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी भेट देऊन मंदिराचा पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यासह विकास करू, असे आश्वासन दिले होते; मात्र ते आश्वासनच राहिले. हे मंदिरही सुविधांपासून वचित आहे. येथे शेवट श्रावण सोमवारी भंडारा नावाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतो, तर गुरूपौर्णिमेला लिंगायतधर्मियांची गर्दी होते. बेळंकी-सलगरे रस्त्यापासून मंदिराकडे जाण्याचा मार्ग डांबरी करण्याची मागणी आहे.