नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे
By Admin | Updated: November 26, 2014 00:07 IST2014-11-25T00:49:37+5:302014-11-26T00:07:35+5:30
मिरजेत आदेश : पंचनाम्यानंतरच नुकसानीचा निर्णय

नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे
मिरज : मिरज तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार किशोर घाडगे यांनी आज (सोमवारी) पंचायत समितीत आयोजित बैठकीत दिले. पंचनाम्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानीचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे.
जिल्ह्यात ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष व फळबागांवर झाला आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे व द्राक्षबागांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाने बागायती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्षबागा व फळबागांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार घाडगे यांनी मिरज पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक गावनिहाय पंचनाम्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक या तिघांवर सोपविण्यात आली. मिरज तालुक्यात म्हैसाळ योजनेमुळे द्राक्ष व फळबागांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने छाटणी होऊन फुले आली होती. अशा नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे या तिघांकडून पंचनामे होणार आहेत. पंचनाम्याचे ५० टक्के व त्याहून अधिक नुकसान असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून प्राप्त होणारा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. याचा निर्णय शासनस्तरावर होणार असल्याचे तहसीलदार घाडगे यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने मिरज तालुक्यातील द्राक्षबागांवर रोगराईचा दुष्परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष व फळबागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)