आंधळीत येरळेवरील बंधाऱ्यामुळे शेतीचा पाणी प्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:40+5:302021-06-09T04:33:40+5:30
सावंतपूर : आंधळी (ता. पलुस) येथे येरळा नदीवर १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील ...

आंधळीत येरळेवरील बंधाऱ्यामुळे शेतीचा पाणी प्रश्न सुटला
सावंतपूर : आंधळी (ता. पलुस) येथे येरळा नदीवर १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी केले.
आंधळी येथे जलसंपदा विभागांतर्गत स्थानिक स्तर विभागाच्या माध्यमातून १ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड, तहसीलदार निवास ढाणे उपस्थित होते. डाॅ. कदम म्हणाले, येरळा नदीवर बंधाऱ्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. डाॅ. पतंगराव कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या विशेष प्रयत्नातून जलसंपदा खात्यातून १ कोटीचा निधी मंजूर झाला होता. या बंधाऱ्यामुळे आंधळी, निंबळक, वाझर, मोराळे व परिसरातील शेतीला पाण्याची उपलब्धता झाली आहे. परिसरात ऊस, द्राक्षे, भाजीपाला व अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतीचे उत्पन्न वाढेल. यापुढेही विविध प्रश्न, विकास कामे यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गोसावी, आंधळीचे सरपंच आमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, बबन पाटील, प्रकाश माने, अशोक कदम, विजय पवार, बजरंग जाधव, ग्रामसेविका सुरेखा पवार उपस्थित होते.