सांगलीतील मिरवणुकांमध्ये डॉल्बीला फाटा

By Admin | Updated: September 28, 2015 23:44 IST2015-09-28T22:03:13+5:302015-09-28T23:44:40+5:30

मध्यरात्रीपर्यंत विसर्जन : १७६ मंडळांच्या गणरायांना निरोप; पारंपरिक वाद्यांनी रंगत

Dalvi fodder in Sangli chillies | सांगलीतील मिरवणुकांमध्ये डॉल्बीला फाटा

सांगलीतील मिरवणुकांमध्ये डॉल्बीला फाटा

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भक्तिभावाने रविवारी अकराव्यादिवशी लाडक्या गणरायाला भक्तांनी निरोप दिला. डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत ढोल, ताशा, लेझीम, झांजपथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात सांगली शहरात निघालेल्या ‘श्रीं’च्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. शहर व परिसरातील १७६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
गणेश विसर्जनाच्या अकराव्यादिवशी सर्व गणेश मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरु केली होती. डॉल्बी बंदीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. ढोल, ताशे, लेझीम व झांजपथकांनी परिसर दुमदुमून गेला होता. आकर्षक लेसर दिवे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५०, विश्रामबाग १७, संजयनगर २४ व सांगली ग्रामीण हद्दीतील ८५ अशा एकूण १७६ मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
कॉलेज कॉर्नरवरील शहीद भगतसिंग, सावकार, राजवाडा चौक आदी मंडळांच्या ‘श्री’चे विसर्जन झाले. रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी असल्याने मिरवणुका उशिरापर्यंत सुरु होत्या. विसर्जनासाठी सरकारी घाटावर मध्यरात्रीपर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)

‘आझाद’ची मिरवणूक लक्षवेधी
खणभागातील ‘आझाद’ गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यामुळे सोन्याचा मुलामा असलेली खास गणेशमूर्ती बनविण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. या गणेश मूर्तीचे नवव्यादिवशी विजर्सन झाले. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. खणभागातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मुलींचे झांजपथक, नाशिकचे ढोल, सैनिकांचा गणवेश परिधान केलेले मावळे हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत फेटे बांधलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. दहा घोडेही सहभागी झाले होते. मंडळाचे संस्थापक रामभाऊ घोडके, साहेबराव पानबुडे, अशोक कारंडे, मनोहर जाधव, दीपक पिराळे, अरुण कांबळे, गणपती कदम आदी उपस्थित होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. पटेल चौकात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मिरवणुकीस भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष सागर घोडके, अमोल घोडके, नितीन नाईक, संजय आरगे, विजय घोडके, बटू घोडके, महेश घोडके, प्रशांत शिंदे आदींनी उत्सवाचे नियोजन केले होते.

Web Title: Dalvi fodder in Sangli chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.