अभद्र युत्यांचे दळभद्री राजकारण

By Admin | Updated: February 1, 2015 00:51 IST2015-02-01T00:50:23+5:302015-02-01T00:51:42+5:30

महापौर, उपमहापौर निवडी : विरोधाची औपचारिकता, पडद्याआडून तडजोडी

Dalbadri politics of hate speech | अभद्र युत्यांचे दळभद्री राजकारण

अभद्र युत्यांचे दळभद्री राजकारण

अविनाश कोळी / सांगली
स्वार्थी हेतूला तत्त्वांचा मुलामा लावून महापालिकेतील सर्वच पक्षाच्या कारभाऱ्यांनी महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने अभद्र युत्यांना जन्म दिला. नावाला विरोधाचे फलक झळकावून पडद्याआड हस्तांदोलन आणि अलिंगन देऊन दळभद्री कारभाराचे दर्शन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केले.
महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने घडलेले महापालिकेतील राजकारण आगामी कारभाराचा ‘ट्रेलर’ आहे. महाआघाडीच्या बिघाडीचा चित्रपट गाजताना त्यातील राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि इद्रिस नायकवडी यांच्या संघर्षाची कहाणी आणि त्यांच्या भूमिका राज्यभर गाजल्या. महाआघाडीच्या चित्रपटाचा नंतर तमाशा झाला. नागरिकांनी पुन्हा असा तमाशा नको म्हणून कॉँग्रेसकडे एकहाती सत्ता सोपविली. कॉँग्रेसच्या सत्ताकाळाला आता दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. इद्रिस नायकवडी यांच्या भूमिकेने पुन्हा एकदा पक्षांतर्गत संघर्षाची कहाणी सुरू झाली आहे. नायकवडी हे दोन्ही सत्ताकाळात तीच भूमिका बजावत आहेत. त्यांच्याच कृपेने महापौर, उपमहापौर निवडीचे नाट्य रंगले.
मिरजेच्या राजकारणाला उतारा म्हणून मिरजेच्याच नगरसेवकांना पाचारण करण्यात आले. निवडीच्या पूर्वसंध्येलाच अभद्र युत्यांच्या चर्चेत रंग भरला. संख्याबळ ४२ चे असताना कॉँग्रेसच्या पारड्यात ५0 मते पडली. आम्ही कोणाकडे पाठिंब्याची मागणीच केली नव्हती, असे कॉँग्रेसचे स्पष्टीकरण म्हणजे स्वाभिमानीवर केलेला एकतर्फी प्रेमाचा आरोपच म्हणावा लागेल. स्वाभिमानी आघाडीने मात्र, एकतर्फी प्रेमाचा इन्कार करीत कॉँग्रेसनेच ‘प्रपोज’ केल्याचे सांगितले. केवळ इतकेच कारण नव्हे, तर विवेक कांबळे यांच्या रूपाने दलित चळवळीतील एक चांगला नेता या पदावर बसत आहे आणि चांगल्या कारभाराच्या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण स्वाभिमानी आघाडीने केले. हे स्पष्टीकरण चतुर राजकारणाचे अंग आहे. स्वाभिमानी प्रेमप्रकरणाला तिसरा अणि चौथाही कोन आहे, ही चौकोनीय प्रेमकथा महापालिकेत चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांच्या गैरहजर राहण्यामागे आणि सहयोगी सदस्य असणाऱ्या दोघा नगरसेवकांच्या तटस्थतेमागेही कॉँग्रेसप्रेमाचेच गणित असल्याचे सांगण्यात येते.
‘भाजप हा नेहमीच कॉँग्रेसच्या विरोधात काम करणारा पक्ष असल्याने आम्ही तटस्थ राहिलो’, असा आव भाजप नगरसेवकांनी आणला. विरोधक म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली असती, तर विधानसभेच्या मदतीचा पैरा त्यांना फेडता आला असता. पण यावेळी त्यांना कॉँग्रेसबरोबर राष्ट्रवादीचेही वावडे वाटले. तटस्थ राहणे म्हणजे युद्धापासून दूर राहणे असाच होतो.
संख्याबळ नाही म्हणून माघार घेणे आणि कमी संख्याबळावरही लढतीचे कर्तव्य पार पाडणे यात शिष्टाचार कोणता, याबाबत त्यांचा संभ्रम दिसून आला. राष्ट्रवादीने हा शिष्टाचार पार पाडला, मात्र स्वकीयांवरील नियंत्रण त्यांनी कसे गमावले, हासुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच महापालिकेच्या राजकारणातील पुढील साडे तीन वर्षे कशी असतील, याचे संकेत या घडामोडींनी दिले आहेत.

Web Title: Dalbadri politics of hate speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.